UPSC तील फसवणूक अन् निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी; NITI आयोगाच्या माजी प्रमुखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 03:26 PM2024-07-21T15:26:55+5:302024-07-21T15:28:37+5:30
UPSC controversy: निती आयोगाचे माजी कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी UPSC च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
UPSC controversy : महाराष्ट्र कॅडरच्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पूजा यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे IAS पद मिळवल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल. दरम्यान, आता NITI आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि G20 चे शेर्पा अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी थेट UPSC च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, याबाबत चौकशी करण्याची मागणीदेखील केली आहे.
कठोर कारवाई व्हावी
NITI आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले की, "UPSC द्वारे घेण्यात येणार्या नागरी सेवांमध्ये फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी."
Several cases of fraud through UPSC for entry to top Civil Services are being alleged. All such cases must be fully investigated and the sternest action taken. Selection on
— Amitabh Kant (@amitabhk87) July 20, 2024
basis of competence and integrity should never get compromised.
I am in favour of SC/ST or OBC…
आरक्षणाचा गैरवापर होत आहे
अमिताभ कांत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निवड ही गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर आधारित असावी, यावर भर दिला. तसेच, एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षणांना पाठिंबा दर्शवत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी असलेल्या विद्यमान आरक्षणाचा आढावा घेण्याची आणि नागरी सेवांमध्ये तृतीय लिंगांसाठी प्रस्तावित 1% आरक्षणाची मागणीदेखील केली. ते म्हणाले, "प्रतिष्ठित परीक्षांमध्ये फायदा मिळवण्यासाठी आरक्षणांचा गैरवापर केला जातोय. SC/ST किंवा OBC आरक्षण चालू ठेवावे, सोबतच क्रिमी लेयरचे नियम लागू केले जावेत," अशी मागणीदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली.
पूजा खेडकर यांचे पद जाऊ शकते
महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निवडीत फायदा मिळवण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यूपीएससीने पूजा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच तुमची उमेदवारी रद्द का करू नये आणि आगामी यूपीएससी परीक्षेत बसण्यापासून का रोखले जाऊ नये? अशी विचारणा नोटीसीतून केली आहे.
निवड प्रक्रियेतील अनियमिततेवर UPSC ने काय म्हटले?
यूपीएससीतील अनियमिततेच्या आरोपांवर आयोगाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यूपीएससीने म्हटले की, आम्ही एक घटनात्मक संस्था आहोत आणि नियमांचे पालन करणे किंवा त्यांची अंमलबजावणी करणे, ही आमची जबाबदारी आहे. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि काही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उमेदवारांचा आमच्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.