मिनी अयोध्येमध्ये वसंतपंतमीची पूजा शांततेत सुरू
By Admin | Published: February 12, 2016 02:44 PM2016-02-12T14:44:03+5:302016-02-12T14:44:03+5:30
मिनी अयोध्या असा उल्लेख करण्यात येणा-या भोजशाला मध्ये तणावाचे वातावरण होते, पण अखेर आज शांततेत पूजा पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
भोजशाला (मध्यप्रदेश), दि. १२ - हिंदुंचा पवित्र सण बसंत पंचमी आणि मुस्लीमांचा शुक्रवारचा नमाज एकाच दिवशी आल्यामुळे मिनी अयोध्या असा उल्लेख करण्यात येणा-या भोजशाला मध्ये तणावाचे वातावरण होते, पण अखेर आज शांततेत पूजा पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
अकराव्या शतकातली ही वास्तू हिंदूंसाठी सरस्वती मंदीर आहे तर मुस्लीमांसाठी कमाल मौला मशिद. ज्या ज्यावेळी वसंत पंचमी शुक्रवारी येते त्या त्या वेळी तणावाचे वातावरण असते आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. पुरातत्व खात्याने मध्यममार्ग काढत हिंदूना दुपारपर्यंत व तीन नंतर संध्याकाळपर्यंत पूजा करण्याची अनुमती दिली तर मुस्लीमांना १२ ते ३ या वेळात नमाजाची अनुमती दिली.
मात्र, सुरक्षा रक्षक पादत्राणे घालून या वास्तूत असल्यामुळे भोजशाळेच्या बाहेर पूजा करण्याचा पवित्रा धर्म जागरण मंचाने घेतला आणि बाहेर पूजा केली. तर जिल्हा तहसीलदारांच्या सांगण्यानुसार जवळपास ३५० भाविकांनी पूजा केली असून अजून भाविक येत आहेत.
सगळं काही व्यवस्थित असल्याचं दाखवण्यासाठी प्रशासन खोटे दावे करत असल्याचं भोज उत्सव समितीचं म्हणणं असून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या वास्तूच्या बाहेरच पूजा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एरवी हिंदूंना मंगळवारी पूजा करण्याची अनुमती आहे आणि मुस्लीमांना शुक्रवारी नमाजाची अनुमती आहे. परंतु २००३, २००६ आणि २०१३ मध्ये शुक्रवारी बसंतपंचमी आल्याने आजच्याप्रमाणेच वादविवादाची परिस्थिती ओढवली होती.