Pooja Yadav: पुजाने जिवाची बाजी लावून 5 जणांना वाचवलं, पण तिला वीरमरण आलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:14 AM2022-02-18T09:14:53+5:302022-02-18T09:16:11+5:30
कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी बुधवारी रात्री 13 जणांचा विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत 6 महिला व 7 मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाची मुलगी असलेल्या पूजा यादव हिने जीवाची बाजी लावून 5 जणांना जीव वाचवला.
कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र, मोठ्या संख्येने असल्याने महिलांच्या जास्त वजनामुळे स्लॅब खाली कोसळला. त्यामुळे, विहिरीवर बसलेल्या सर्व महिला विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये, 21 वर्षीय पूजा यादवचाही समावेश आहे. या दुर्दैवी घटनेदरम्यान पूजाने दाखवलेल्या धाडसाचं मोठं कौतूक होत आहे. पुजाने 5 जणांचा जीव वाचवला, त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. सैन्यदलात भरती होण्यासाठी पूजा तयारी करत होती, मात्र काळाने असा भविष्यकाळ तिच्यासमोर ठेवला होता.
पूजाचे वडिल बलवंत हे सैन्यदलात आहेत, आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते चिंताग्रस्त होते. एकीकडे मुलगी सैन्य दलात भरती झाली नव्हती, तर दुसरीकडे तिचे लग्नही भरतीमुळे थांबले होते. मात्र, आता आपल्या लाडक्या लेकीला शेवटचा निरोप देण्याची वेळ दुर्दैवाने पित्यावर आली. या धाडसी पुजासाठी संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पूजासोबत तिची आईही विहिरीत बुडत होती. पुजाने एकापाठोपाठ एक असं करत, 5 जणांचा जीव वाचवला. सहाव्या महिलेला वाचवताना पूजा स्वत: पाण्यात बुडाली.
मी सर्वांनाच वाचवणार अशी मनाची तयारी पुजाने केली होती, त्यासाठी ती विहिरीत उतरली होती. पुजाचा हा धाडसी बाणा पाहून रडणारे, धावा करणारे पीडित मदतीसाठी पुजाचेच नाव घेत होते. दरम्यान, पूजा ही तहसीलदार शाही महाविद्यालय सिन्हा येथे बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. त्यासोबतच तिचे दोन जुळे भाऊ आदित्य आणि उत्कर्ष हे होते. या दोन्ही भावांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला. हे दोघे भाऊ इयत्ता 9 वीत शिकत होते. पुजाचे वडिल सध्या दिल्लीत पोस्टींगवर आहेत.
स्थानिकांनी दिली पोलिसांना माहिती
या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. तसेच काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. परंतु महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.