पूनम आझाद ‘आप’मध्ये
By admin | Published: November 14, 2016 01:31 AM2016-11-14T01:31:40+5:302016-11-14T01:31:40+5:30
भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम यांनी आम आदमी पार्टीत सामील होत गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या तर्कवितर्कांना विराम दिला.
नवी दिल्ली : भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम यांनी आम आदमी पार्टीत सामील होत गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या तर्कवितर्कांना विराम दिला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यामुळेच मला भाजपची साथ सोडावी लागली, असा परखड आरोपही त्यांनी केला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत आपमध्ये सामील झालेल्या पूनम यांची पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल, असे ‘आप’ने स्पष्ट केले. ‘आप’मध्ये युवकांसाठी मला उज्ज्वल भवितव्य दिसते, असे पूनम आझाद यांनी सांगितले. तत्पूर्वी, पूनम यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. पूनम यांचे पक्षात स्वागत करताना सिसोदिया यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्यात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. ‘आप’चे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी यावेळी सांगितले की, पंजाब निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. चर्चा केल्यानंतर त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल.
आम आदमी पार्टीत मला युवकांसाठी उज्ज्वल भवितव्य दिसते. अरुण जेटली यांच्यामुळेच मला भाजप सोडावा लागला. अनेकदा शब्द देऊन त्यांनी निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध माझे पती कीर्ती आझाद यांनी आवाज उठविल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले. पूनम यांनी भाजप दुटप्पी असल्याचा आरोपही केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)