Poonch Encounter: पुंछमधील चकमकीबाबत समोर आली धक्कादायक माहिती, दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी कमांडोही भारतीय लष्कराला देताहेत आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:41 AM2021-10-18T09:41:34+5:302021-10-18T09:42:58+5:30
Poonch Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये सुमारे आठ दिवसांपासून भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
जम्मू - जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये सुमारे आठ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार या संदर्भात लष्कर आणि पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ज्या उग्रपणे दहशतवाद्यांनी लढा दिला आहे. ते पाहता त्यांना पाकिस्तानी कमांडोंकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची शक्यता आहे. पुंछमधील सुरनकोटमध्ये गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये आतापर्यंत नऊ जवानांना वीरमरण आले आहे. दरम्यान ही चकमकीची व्याप्ती पुंछमधील मेंढर आणि राजौरीच्या थानामंडीपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, या चकमकीत कुठला दहशतवादी मारला गेला आहे का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण आतापर्यंत एकही मृतदेह मिळालेला नाही. मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम, कडेकोड घेराव आणि प्रचंड गोळीबार होऊनही घनदाट जंगलामधील आठ ते नऊ किलोमीटरच्या परिसरात चकमक सुरू आहे.
नियंत्रण रेषेजवळ पुंछच्या डेरावाली गली परिसरामध्ये १० ऑक्टोबरच्या रात्री या दहशतवाद्यांसोबत झालेल्या पहिल्या चकमकीत एका जेसीओसह पाच जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर गुरुवारी नरखासच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत असलेल्या लष्कराच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी दबा धरून हल्ला केला. यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले, तर एका जेसीओसह अन्य दोघेजण बेपत्ता झाले. दोन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह सापडले.
लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी आठ दिवसांपासून ज्या पद्धतीने लष्कराच्या जवानांना आव्हान देत आहेत. ते पाहता त्यांना पाकिस्तानच्या एलिट कमांडोंकडून प्रशिक्षण मिळाल्याचे संकेत मिळत आहे. तसेच लष्कराच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दहशतवाद्यांच्या या समुहामध्ये पाकिस्तानी कमांडोंचाही समावेश असू शकतो. मात्र या सर्वांना कंठस्नान घातल्यावरच आम्हाला याबाबत माहिती मिळेल.
दरम्यान लष्कराला सावधपणे कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मोहीम संपुष्टात आली तरी जवानांपैकी कुणाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांना एका भागात घेरण्यात आले आहे. लष्कराचे पॅरा कमांडो आणि हॅलिकॉप्टरच्या मदतीने ही चकमक लवकरच संपुष्टात आणली जाईल, असा विश्वास लष्कराने व्यक्त केला आहे.