मुलाच्या बर्थडेला पार्टी देणार होते, पण आता शहीद जवानाच्या घरात अंत्यसंस्काराची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:34 AM2024-05-06T10:34:48+5:302024-05-06T10:35:42+5:30
शनिवारी पहाटे ३३ वर्षीय विक्की पहाडे गोळी लागल्याने उधमपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत पावले
पुंछ - जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात भारतीय वायूसेनेचा एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांनी ४ मे रोजी इंडियन एअरफोर्सच्या वाहनावर फायरिंग केली. ज्यात गंभीर जखमी झालेल्या जवानाला उपाचारासाठी हॉस्पिटलला दाखल केले. परंतु त्याठिकाणी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या शहीद जवानाचं नाव विक्की पहाडे असं होतं.
७ मे रोजी शहीद विक्की पहाडे यांच्या एकलुत्या एक मुलाचा वाढदिवस होता. मुलाच्या बर्थ डेला विक्की घरी येणार होते. मुलाच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त ते सर्वांना पार्टी देण्याची तयारी करत होते. त्यासाठी सातत्याने ते नातेवाईकांच्या संपर्कात होते. परंतु मुलाच्या वाढदिवसापूर्वीच दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. त्यामुळे ज्या घरात मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी सुरू होती तिथे आता वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी होत आहे.
शनिवारी पहाटे ३३ वर्षीय विक्की पहाडे गोळी लागल्याने उधमपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत पावले. सुट्टीला विक्की पहाडे घरी परतणार यासाठी सर्वच उत्सुक होते. त्यांच्या मुलाचा वाढदिवस ७ मे रोजी होता. घरात बर्थ डे पार्टीची तयारी होती. त्यात आता अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे. या घटनेनं कुटुंब शोकाकुल आहे. आज शहीद जवानाचा मृतदेह घरी येण्याची शक्यता आहे. २ आठवड्यापूर्वीच बहिणीच्या लग्नासाठी विक्की घरी आले होते. २०११ मध्ये ते भारतीय वायू सेनेत सेवेसाठी दाखल झाले.
दरम्यान, भारतीय वायू सेनेनं या हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. सीएस एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांच्या वायू सेनेतील इतर सहकाऱ्यांना विक्की पहाडे यांच्या शौर्याला सलाम केला. भारतीय वायू सेना या दु:खद प्रसंगी पहाडे यांच्या कुटुंबासोबत मजबुतीने उभी आहे असंही वायू सेनेने म्हटलं. तर दहशतवाद्यांशी लढताना माझ्या भावाने देशासाठी बलिदान दिले. त्याचा मला गर्व असल्याचं शहीद विक्की पहाडे यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले.