Poonch Terror Attack : "माझं सत्य खोटं मानलं जातंय", पूंछ हल्ल्याबाबत चौकशी केलेल्या व्यक्तीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 09:05 AM2023-04-28T09:05:28+5:302023-04-28T09:06:36+5:30
20 एप्रिल रोजी पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, या व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. या व्यक्तीने मृत्यूच्या दोन दिवस आधी विष प्राशन केले होते. या व्यक्तीने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की,"मी सांगितलेल्या खऱ्या गोष्टी खोट्या मानल्या जात होत्या. त्यामुळे मी मृत्यूचा मार्ग निवडला". दरम्यान, 20 एप्रिल रोजी पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते.
नार मेंढार गावातील रहिवासी मुख्तार हुसैन शाह याला पोलिसांनी पुंछमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. मुख्तारच्या मृत्यूनंतर त्याच्या गावात निदर्शने सुरू झाली आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी निदर्शने करत भाटा धुरियनजवळ जम्मू-पुंछ रस्ता रोखून धरला. भाटा धुरियन हे तेच ठिकाण आहे, जिथे गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत एकूण 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांना दहशतवादी हल्ल्याबाबत विचारपूस करण्यात आली होती आणि त्यातील बहुतेकांना प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच, एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्तार हुसैन संशयास्पद होता, त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याला फोन करण्यामागचे कारण म्हणजे दहशतवाद्यांनी गोळीबार केलेल्या ठिकाणापासून त्याचे घर अगदी जवळ होते.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला मुख्तार?
राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुख्तार यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, मी कोणत्याही दबावाशिवाय हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तसेच, त्याने शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त केला आणि आशा व्यक्त केली की, आपले लोक देशासाठी एकत्र येतील. इतकंच नाही तर त्याची पत्नी आणि मुलांचीही काळजी घेतील. याचबरोबर, व्हिडीओमध्ये मुख्तारने सांगितले की, गेल्या वर्षी झालेल्या ऑपरेशनमध्ये त्याने लष्कर आणि पोलिसांना मदत केली होती. माझा कोणत्याही दहशतवादी किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध नाही. मुख्तार चुकीचा आहे असे वाटल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करू नये. माझ्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे आणि माझे सत्य खोटे म्हणून पाहिले जात आहे.