Poonch terror attack : इफ्तारसाठी ट्रकमधून फळे घेऊन जात होते जवान; गावकरी म्हणाले, "ईद साजरी करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:09 AM2023-04-22T11:09:41+5:302023-04-22T11:23:41+5:30

इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने गावातील लोक दु:खी झाले आहेत.

Poonch terror attack: Truck was carrying fruits for iftar, village says won’t celebrate Eid | Poonch terror attack : इफ्तारसाठी ट्रकमधून फळे घेऊन जात होते जवान; गावकरी म्हणाले, "ईद साजरी करणार नाही"

Poonch terror attack : इफ्तारसाठी ट्रकमधून फळे घेऊन जात होते जवान; गावकरी म्हणाले, "ईद साजरी करणार नाही"

googlenewsNext

जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 5 जवान शहीद झाले. या घटनेनंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, हा भ्याड हल्ला झाला, त्यावेळी हे लष्करी जवान पूंछमधील एका गावात आयोजित इफ्तार पार्टीसाठी ट्रकमधून फळे आणि इतर वस्तू घेऊन जात होते. या इफ्तार पार्टीत उपवास करणाऱ्यांसोबत त्या गावचे पंच, सरपंच यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, राष्ट्रीय रायफल्स (RR) च्या जवानांनी 20 एप्रिलच्या संध्याकाळी सैंगोट भागात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लष्करांकडून अशा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. इफ्तार पार्टीच्या या आयोजनामुळे दहशतवादी नाराज झाले होते. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.

इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने सैंगोट गावातील लोक दु:खी झाले आहेत. या हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत गावातील लोकांनी यावेळी ईद साजरी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना सर्वात मोठी भीती ही असते की लोकांनी लष्कराला आपला मित्र मानू नये, असे झाले तर ते लोकांना भडकावू शकणार नाहीत. यामुळेच दहशतवाद्यांना लोकांचा लष्कराशी संबंध आवडत नाही. लष्कराशी संवाद साधणाऱ्या लोकांकडे दहशतवादी संशयाने पाहतात. 

सैंगोट येथे होणार्‍या इफ्तार पार्टीची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ल्याची योजना आखली. लष्कराचा ट्रक इफ्तारचे साहित्य घेऊन कॅम्पकडे परतत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनाला लक्ष्य केले. यावेळी अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी आधी गोळ्या झाडल्या, त्यानंतर ग्रेनेडने हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरू
या हल्ल्यात हवालदार मनदीप सिंग, हरकिशन सिंग, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई सेवक सिंग आणि लान्स नाईक देबाशिष बसवाल हे पाच जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दल संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. दुसरीकडे, या हल्ल्याची जबाबदारी पीएएफएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी पीएएफएफ संबंधित आहे.

Web Title: Poonch terror attack: Truck was carrying fruits for iftar, village says won’t celebrate Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.