शाब्बास पोरा! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:40 PM2023-11-06T12:40:35+5:302023-11-06T12:48:18+5:30

हृदय कुमारला क्रिकेटची आवड होती. त्याला यातच आपलं करिअर करायचं होतं. पण काही कारणांमुळे क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही.

poor farmer son hrudaya kumar das become irs officer crack civil service exam third attampet | शाब्बास पोरा! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला अधिकारी

फोटो - hindi.news18

UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस-आयपीएस बनण्याचं हजारो तरुणांचं स्वप्न आहे. पण काही लोकांची निराशा होते. सर्व अडचणी आणि संकटांवर मात करून आपलं ध्येय साध्य करणाऱ्या अनेक लोकांच्या कहाण्या खूप प्रेरणादायी आहेत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट ओडिशातील रहिवासी हृदय कुमार दाशची आहे. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हृदय कुमारचे वडील शेतकरी होते.

हृदय कुमारला क्रिकेटची आवड होती. त्याला यातच आपलं करिअर करायचं होतं. पण काही कारणांमुळे क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही. यानंतर त्याने एक नवीन स्वप्न पाहिलं तेही UPSC उत्तीर्ण होण्याचं. मात्र हे स्वप्न पूर्ण करणं तसं सोपं नव्हतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून तो आयआरएस अधिकारी बनला.

ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील अंगुलाई या दुर्गम गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या हृदय कुमार दाशने गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेतलं. तो अभ्यासात खूप हुशार होता. क्रिकेट ही त्याची आवड होती. आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतही त्याने आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. पण त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट सोडून उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर उत्कल विद्यापीठातून पाच वर्षे इंटिग्रेटेड एमसीए केले.

UPSC पास केल्यानंतर हृदय कुमारने सांगितलं होतं की, त्याच्या वडिलांना त्याच्या अभ्यासासाठी आपली जमीन विकावी लागली. एका कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा त्याला अभिमान आहे. हृदय कुमारने विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान यूपीएससीची तयारी सुरू केली. यासोबतच तो ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामीण विकास फेलो म्हणूनही कार्यरत होता. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींशी संवाद साधणे आणि मागासलेल्या भागात गरिबी निर्मूलन आणि कल्याणकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे हे त्यांचं काम होते. 

नोकरीमुळे त्याला आदिवासींच्या समस्या समजून घेण्यात खूप मदत झाली. त्यामुळे नागरी सेवेत रुजू होण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली. UPSC नागरी सेवा परीक्षेत हृदय कुमार दोनदा नापास झाला. पण अखेर तिसर्‍या प्रयत्नात मेहनत आणि चिकाटीचे फळ मिळाले. त्याने 2015 मध्ये ऑल इंडिया रँक 1079 सह यूपीएससी पास केली. त्याची आयआरएस सेवेसाठी निवड झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: poor farmer son hrudaya kumar das become irs officer crack civil service exam third attampet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.