गरीब आजीच्या मनाची श्रीमंती, ६०० रुपयांच्या पेन्शनमधून मजुरांसाठी ५०० ₹ दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:59 PM2020-06-01T18:59:50+5:302020-06-01T19:00:24+5:30
लॉकडाऊन झालं अन् कामगार, मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला. अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नछत्र सुरु करुन गरिबांना मदत केली. याच कालावधीत कित्येकांनी माणूसकी दाखवत खारीचा वाटा उचलला.
बंगळुरू - कोरोना आला अन् माणसातली माणूसकी पावलोपावली दिसायला लागली. कोरोनावरील संकट हे देशावरील संकट म्हणून प्रत्येकजण याकडे पाहू लागले. त्यातूनच, अनेक उद्योजक, सेलिब्रिटी पुढे येऊन पंतप्रधान मदतनिधीसाठी मदत करु लागले, अनेक कंपन्यांनी, व्यक्तींनी, संस्थांनी पीएम आणि सीएम रिलिफ फंडात आपलं योगदान दिलं. विशेष म्हणजे गावखेड्यापासून ते राजधानी मुंबई, दिल्लीपर्यंत सर्वांनीच मदतकार्यात सहभाग नोंदवला. कर्नाटककमधील एका ७० वर्षीय आजीनेही असाच मदतीचा हातभार लावला आहे. या आजीबाईच्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लॉकडाऊन झालं अन् कामगार, मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला. अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नछत्र सुरु करुन गरिबांना मदत केली. याच कालावधीत कित्येकांनी माणूसकी दाखवत खारीचा वाटा उचलला. अगदी पारले बिस्कीटपुडा देण्यापासून ते मिष्ठान्न भोजने देण्यापर्यंत अनेकांनी सेवाभाव जपला. कर्नाटकातील म्हैसूर शहरात राहणाऱ्या कमलअम्मा या ७० वर्षीय आजींनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत, ६०० रुपयांच्या पेन्शनमधून ५०० रुपये परप्रांतीय मजुरांसाठी जेवण बनवणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांना दिले. गेले काही दिवस सोशल मीडियावर या आजीबाईंची कहाणी चांगलीच व्हायरल झाली होती.
लॉकडाऊन काळात मजूरांच्या मदतीसाठी हजारो होत पुढे आले आहेत. प्रत्येकाने या मजुरांसाठी, त्यांच्या चिमुकल्यांसाठी मदत देऊ केली. त्यात, अनेक गरिबांनीही आपल्या भाकरीतील अर्धी भाकर देत मदतीचं दातृत्व दाखवलं. म्हैसुरमधील ७० वर्षीय कमलअम्मा यांच्या दातृत्वाची कहाणी नेटीझन्सला चांगलीच भावली. आपल्या पतीच्या निधनानंतर कमलअम्मा घरकामं करतात. मात्र, लॉकडाउन काळात कमलअम्मांचं वय पाहता, त्यांनी काम करु नये यासाठी घरमालकांनी त्यांना कामावर येऊ नका असं सांगितलं. कमलअम्मा यांना दोन मुलं असली तरीही या काळात त्या कोणावरही अवलंबून नाहीत, सरकारकडून मिळणाऱ्या ६०० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्या आपलं दैनंदीन जिवन जगत होत्या. काही दिवसांपूर्वी म्हैसूर भागातील रोटरी क्लबच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अन्नदान मोहिमेच्या माध्यमातून कमलअम्मांना मदत केली. यावेळी अम्मांनी अन्नदानासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त करत, आपल्या पेन्शनमधील ५०० रुपये मदत कमल अम्मांनी देऊ केली.
कमल अम्मा परिस्थितीने गरीब असल्या तरी त्यांच्या मनाची श्रीमंती सोशल मीडियावर कौतुकाचा विषय बनली आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात, यापेक्षा तुमच्या मनाचा मोठेपणा नेहमीच तुमची श्रीमंती दर्शवत असतो. आपल्याला भेटणाऱ्या ६०० रुपये पेन्शनपैकी ५०० रुपयांची मदत देऊ करणाऱ्या कमल अम्मा म्हणून श्रीमंत वाटतात.