कोंडी कायम : संसदेत गदारोळ
By admin | Published: August 1, 2015 02:11 AM2015-08-01T02:11:11+5:302015-08-01T02:11:11+5:30
ललित मोदी प्रकरण, व्यापमं घोटाळा आणि अन्य मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी शुक्रवारी प्रचंड गोंधळ घालून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प पाडले.
नवी दिल्ली : ललित मोदी प्रकरण, व्यापमं घोटाळा आणि अन्य मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी शुक्रवारी प्रचंड गोंधळ घालून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प पाडले. तुम्ही कितीही गोंधळ घाला, मी कामकाज तहकूब करणार नाही, असे सुनावत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आणि कामकाज सुरू ठेवले; परंतु गोंधळ थांबला नाही.
अखेर महाजन यांनी कामकाज संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यसभेतही अभूतपूर्व गदारोळ झाला. परिणामी सभापतींना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सरकार काँग्रेससोबत चर्चेस तयार
संसदेतील कोंडी फोडण्यासाठी आपण काँग्रेससोबत चर्चा करण्यास तयार आहोत. या संदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी यांनी सांगितले. तथापि काँग्रेसची चर्चेची तयारी नसणे ही चिंतेची बाब आहे, असे रुडी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)