देशातील सर्वात गरीब लोकसभा उमेदवार, बँक खात्यात एकही रुपया नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:30 AM2019-04-02T07:30:30+5:302019-04-02T07:31:49+5:30
पायी फिरूनच प्रचार : ना सोने-नाणे ना रोख रक्कम
मेरठ : मुजफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे वकील मंगेराम कश्यप (५१ वर्षे) यांच्या बँकखात्यात शून्य शिल्लक असून, त्यांच्याजवळ रोख स्वरूपात एक रुपयाही नाही. या निवडणुकांतील ते सर्वात गरीब उमेदवार असावेत. पायी फिरून आपला प्रचार करण्यावर त्यांचा भर आहे.
मुजफ्फरनगर न्यायालयात वकिली करणारे मंगेराम २००० सालापासून मजदूर किसान युनियन पार्टीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आले आहेत. या पक्षाचे एक हजार कार्यकर्ते असून त्यातील बहुतेक जण मोलमजुरी करतात. मंगेराम कश्यप यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे सोनेनाणे, रोख रक्कम काहीही नसून बँक खात्यात शून्य शिल्लक आहे. त्यांची पत्नी बबिता कश्यप यांचीही आर्थिक अवस्था तशीच आहे. मंगेराम यांच्या मालकीचा १००चौरस यार्डाचा एक भूखंड असून, त्याची किंमत ५ लाख रुपये आहे. ६० यार्डाच्या भूखंडावर बांधलेल्या घराची किंमत १५ लाख रुपये आहे. ते घर त्यांना सासरच्या मंडळींनी भेट स्वरूपात दिले आहे. त्यांच्याकडे एक बाइक असून, तिची किंमत ३६ हजार रुपये आहे.
.
मंगेराम कश्यप यांनी सांगितले की, बाइकच्या पेट्रोलचा खर्च मला परवडत नाही. माझी पत्नी गृहिणी असून आम्हाला दोन मुले आहेत. गुजराण करण्यासाठी मी दुसरी नोकरी शोधण्याचा केलेला प्रयत्नही असफल ठरला. त्यामुळे पायी फिरून प्रचार करण्यावरच मी भर दिला आहे. अनेक उमेदवार स्वत:च्या प्रचारावर खर्च करत असलेला प्रचंड पैसा खरे तर गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल.
मंगेराम यांनी लढविलेल्या
प्रत्येक निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. आपण कधी ना कधी नक्कीच निवडून
येऊ हे त्यांचे स्वप्न नजीकच्या काळात पूर्ण व्हायची मुळीच शक्यता नाही. मात्र, तरी यंदा आपल्याला यश
मिळेल, अशी आशा त्यांच्या मनात जिवंत आहे. (वृत्तसंस्था)
मतदारांसाठी पेन्शन योजना
मुजफ्फरनगर मतदारसंघात ते भाजपचे संजीव बलियान, रालोदचे अजितसिंह यांसारख्या तगड्या उमेदवारांविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. राजकारणी नेता गरिबांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. मी गरिबांना मदत करायला नेहमीच तत्पर असतो. मतदारांसाठी मी पेन्शन योजना राबवेन, म्हणजे कोणत्याही माणसाला पैशासाठी वणवण करावी लागणार नाही, असेही मंगेराम कश्यप यांनी सांगितले.