मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:04 PM2024-06-10T19:04:06+5:302024-06-10T19:05:10+5:30

अमित शाह पुन्हा देशाचे गृहमंत्री, तर नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.

Portfolio Allocation In Modi Cabinet 3.0 : Modi Government Ministry Allocation Announced; Ministry of Home-Defense-Foreign-Highways-Railways to BJP | मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

Portfolio Allocation In Modi Cabinet : काल(दि.9 जून) मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर सर्वांच्या नजरा खातेवाटपावर लागल्या होत्या. आज मोदी सरकारची पहिली बैठक पार पडली, यात खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक  व महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह (Rajnath Singh), निर्मला सीतारामन (Nrimala Sitharaman) आणि  एस जयशंकर (S. Jaishankar) यांनाही त्यांचे पूर्वीचे खाते मिळाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज मोदी कॅबिनेटच्या बैठकीनंतर खातेवाटपाचा निर्णय घेण्यात आला. यात अमित शाह यांना गृह, राजनाथ सिंह यांना संरक्षण, निर्मला सीतारामन यांना अर्थ, नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक, अश्वनी वैष्णव यांना रेल्वे आणि जयशंकर यांना पुन्हा परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

शिवराज सिंह यांच्याकडेही दोन खात्यांची जबाबदारी 
तसेच, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय 
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना नगरविकास मंत्रालयाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, गोव्यातील नेते श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना आरोग्यमंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण, गजेंद्र शेखावत यांना कला पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय, सीआर पाटील यांना जलशक्ती मंत्रालय, चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, एचडी कुमारस्वामी यांना अवजड उद्योग मंत्रालय, ज्योतिरादित्य शिंदे यांना टेलिकॉम मंत्रालय, अश्विनी वैष्णव यांना  माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि टीडीपी नेते राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आज झालेल्या मोदी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पीएम आवास योजनेत वाढ करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेंतर्गत देशभरात 3 कोटी नवीन घरे बांधली जातील. यापूर्वी 4.21 कोटी घरे बांधली गेली आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांसाठी केली. त्यानुसार, देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा 17वा हफ्ता पाठवण्यात आला.

Web Title: Portfolio Allocation In Modi Cabinet 3.0 : Modi Government Ministry Allocation Announced; Ministry of Home-Defense-Foreign-Highways-Railways to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.