नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून काढलं घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 05:24 PM2017-09-09T17:24:37+5:302017-09-09T17:30:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे.
बलिया, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय नगमा परवीन बोलू शकत नाहीत. पण नगमाला जे काही बोलायचं असतं ते ती चित्र काढून सांगते. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकला असंविधानिक ठरविल्यानंतर नगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पेंटिंग काढून तिच्या पतीला दाखवलं. पण पतीला मोदी आणि आदित्यनाथ यांचं पेंटिंग दाखवणं नगमाला महागात पडलं आहे. यामुळे नगमाला सासरच्यां लोकांनी बेदम मारहाण केली तसंच तिला वेडं ठरवत घराबाहेर काढलं. ही घटना बलियामधील बसारिकपूर या गावात घडली आहे.
सासरी मारहाण झालेली नगमा त्यानंतर तिच्या माहेरी गेली. तेथे तिच्या वडिलांनी या संदर्भातील तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास केला जातो आहे. नवभारत टाइम्सने ही बातमी दिली आहे.
सिकंदरपूर भागातील मटुरी गावची रहिवासी असणारी नगमा परवीन हिचं लग्न बसारिकपूर गावातील परवेज खान यांच्याशी 26 नोव्हेंबर 2016 मध्ये झालं. लग्नानंतर हुंड्यावरून तिच्या सासरच्या लोक तिला त्रास देत होते. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाक असंविधानिक असल्याचा निर्णय दिल्यावर नगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं पेंटिंग बनवलं. ते पेंटिंग नगमाने नंतर तिच्या पतीला दाखवलं. पण नगमाने केलेलं हे कृत्य तिच्या सासरच्या मंडळींना आवडलं नाही. त्यांनी नगमाला वेडं ठरवत मारहाण करायला सुरू केली. मारहाणीला कंटाळलेल्या नगमाने याबद्दलची माहिती तिच्या वडिलांना दिली. नगमाचे वडील सासरी आल्यावर त्यांनी सासरच्या मंडळींकडे प्रकरणाबद्दल विचारणा केली. तुमची मुलगी वेडी झाली आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचं पेंटिंग काढून ते घरात लावते आहे, म्हणून तिला इथे राहण्याचा अधिकार नाही, असं नगमाच्या सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांना सांगितलं.
सासरच्यांकडून मिळालेल्या या उत्तरानंतर नगमाच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून या संदर्भातील तक्रार दाखल केली. दरम्यान नगमाला हुंड्यावरून घरचे त्रास देत असल्याची तक्रार 20 जुलै रोजी दाखल झाली होती. नगमाने बनविलेल्या पेंटिंगनंतर जे काही घडलं याबद्दल माहिती असल्याचं सिकंदरपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख धर्मेद्र सिंह यांनी सांगितलं.