'दिल्लीत पॉझिटीव्ह, जयपुरात निगेटीव्ह', फोटो शेअर करत खासदारानेच व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:00 PM2020-09-14T18:00:16+5:302020-09-14T18:01:03+5:30
संसदेतील अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेच्या शन आजपासून सुरू झाले असून, कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, कोरोना अहवालाच्या चाचणीवरुन एका खासदारानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाचणीचे दोन्ही अहवाल शेअर करत नेमका कोणता अहवाल खरा धरावा, असा प्रश्न खासदार हनुमान बेनीवाल यांनी विचारला आहे.
संसदेतील अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत पॉझिटीव्ह आलेल्या खासदाराची कोरोना चाचणी जयपुरात निगेटीव्ह आली आहे.
कोरोना अहवाल आणि चाचण्यांबद्दल अनेकदा संभ्रम निर्माण करणारे अहवाल आले आहेत. कित्येकदा एकीकडे पॉझिटीव्ह तर दुसरीकडे निगेटीव्ह अहवाल आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, आता चक्क खासदार महोदयांसोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे, कोरोना चाचणीच्या अहवालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिवेशनापूर्वी चाचणी केलेल्या खासदारांमध्ये भाजपाच्या मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, हनुमंत बेनीवाल यांच्यासह 12 खासदार पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये, हनुमान बेनीवाल यांनी 11 सप्टेंबरला कोरोना चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. त्यानंतर, लोकसभा सचिवालयातून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले.
मैंने लोकसभा परिसर में #Covid19 की जांच करवाई जो पॉजिटिव आई उसके बाद जयपुर स्थित SMS मेडिकल में जांच करवाई जो नेगेटिव आई,दोनों रिपोर्ट आपके साथ साझा कर रहा हूँ,आखिर किस रिपोर्ट को सही माना जाए ? pic.twitter.com/6NgU0jBdWE
— HANUMAN BENIWAL (@hanumanbeniwal) September 14, 2020
खासदार हनुमान बेनीवाल यांनी स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा एकदा जयपूरमध्ये आपली कोरोना चाचणी केली. त्यामध्ये, त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे, गोंधळलेल्या खासदार बेनीवाल यांनी आपल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, नेमका कोणता रिपोर्ट खरा धरायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
संसदेचं अधिवेशन आजपासून
संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. तत्त्पूर्वी केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले होते. अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत.