अद्रमुक नेते दिनकरन यांना अटक होण्याची शक्यता
By admin | Published: April 18, 2017 01:02 AM2017-04-18T01:02:35+5:302017-04-18T01:02:35+5:30
अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे (अम्मा) उप सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी करण्यासाठी...
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे (अम्मा) उप सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तुकडी चेन्नईला रवाना झाली आहे. अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाचे दोन पाने हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला १.३० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप आहे व तसा गुन्हाही दिल्ली पोलिसांनी दाखल केला.
तामिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आयकर विभागाच्या छाप्यांनंतर रद्द झाली व या निवडणुकीत पैशांचा वापर झाला होता. दिनकरन यांनी आर. के. नगर मतदार संघातील मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल, आयकर आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पैशांच्याच कारणावरून ही पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या प्रकरणी दिनकरन यांना अटक होण्याची शक्यता आहे. दोन पाने हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी दिनकरन यांनी सुकेश चंद्रशेखर याच्यामार्फत अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.
अ. भा. अ. द्रमुक पक्षात फूट पडल्यामुळे दोन पाने हे चिन्ह सध्या आयोगाने गोठवले आहे. या पोट निवडणुकीसाठी आयोगाने दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह दिले आहे. दिनकरन हे शशीकला यांचे भाचे असून, सध्या शशीकला या बंगळुरुतील तुरुंगात आहेत. शशीकला यांनी दिनकरन यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.
दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर याला दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून रविवारी अटक केल्यावर लाचेचे हे प्रकरण उघडकीस आले. गोठवण्यात आलेले दोन पाने हे चिन्ह तुमच्या गटाला मी मिळवून देऊ शकतो, अशी खात्री चंद्रशेखर याने दिनकरन यांची भेट घेऊन दिली होती व त्या जाळ््यात दिनकरन सापडले. दिनकरन यांनी १.३० कोटी रुपये आगावू दिले. ही रक्कम चंद्रशेखर याची निवडणूक अधिकाऱ्यांना देण्याची योजना होती. दिनकरन हे चंद्रशेखर याच्या थेट संपर्कात होते. त्यांच्या फोनचा तपशीलही उपलब्ध आहे.
माझी संघटना राजकीयदृष्ट्या नाहीशी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप टीटीव्ही दिनकरन यांनी केला. या खटल्याला मी संघर्षाने तोंड देईन. मी कोणालाही लाच दिली नाही, मी सुकेश चंद्रशेखर यांना ओळखत नाही. एखादा मध्यस्थ किंवा अन्य कोणी तरी पैसे हे टीटीव्ही दिनकरन यांच्याकडून आले, असे कसे म्हणू शकतो? त्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. त्याला बघितले नाही.
- टीटीव्ही दिनकरन