समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:42 AM2019-09-30T04:42:09+5:302019-09-30T04:42:22+5:30
भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे
नवी दिल्ली : भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता केले.
नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर दिवसभराच्या सफरीसाठी गेलेल्या राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना अशी ग्वाही दिली दिली की, भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावर नौदलाची प्रबळ उपस्थिती असल्याने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती कदापि होऊ दिली जाऊ शकत नाही.
ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत काय झाले हे कदापि विसरता येणार नाही. एकदा झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच आपले नौदल आणि तटरक्षकदल सदैव तत्पर असतात. याविषयी जराही शंका घेणचे कारण नाही. समुद्रमार्गे पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी विचारता संरक्षणमंत्री म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाला स्वत:च्या संरक्षणासाठी चोख उपाय योजावेच लागतात. भारताने हवाई हल्ला करून उद््ध्वस्त केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला आहे व तेथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत सीमेवर आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच म्हटले होते. त्याविषयी विचारता राजनाथ सिंह म्हणाले की, हे दहशतवादी कोण पाठविते हे जसे सर्व जगाला माहीत आहे.
पाकने युद्धाचा विचारही करू नये
पाकिस्तानने भारताशी पुन्हा युद्ध करण्याचा विचारही करू नये, असे स्पष्टपणे बजावताना शनिवारी मुंबईत राजनाथसिंह म्हणाले होते की, सरकारचा दृढ निर्धार आणि ‘आयएनएस खंदेरी’ विनाशिकेसह अन्य युद्धनौकांनी भारतीय नौदलाचे वाढलेले बळ पाहता आता युद्ध झाल्यास १९७१ पेक्षाही मोठी हानी पाकिस्तानला सोसावी लागेल.