गोवा, मुंबई, दिल्लीत अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:50 AM2019-03-26T00:50:24+5:302019-03-26T00:50:37+5:30
गोवा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अल-कायदा आणि इसिसच्या अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : गोवा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अल-कायदा आणि इसिसच्या अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे अतिरेकी हल्ले होऊ शकतात. भारतातील यहुदी लोकांना यात लक्ष्य केले जाऊ शकते.
अतिरेकी हल्ल्यासाठी वाहन अथवा चाकूचा वापर केला जाऊ शकतो. मुंबईतील इस्रायलचे दूतावास, महावाणिज्यिक दूतावास आणि छाबड हाऊसची सुरक्षा वाढविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याबाबची पहिली माहिती २० मार्च रोजी देण्यात आली होती. इसिसचा प्रवक्ता अबू हसन अज मुजाहिरची आॅडिओ क्लिप त्यांच्या गु्रप व चॅट प्लॅटफॉर्मवर पाठविण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेला अनेक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला?
न्यूझीलंडमध्ये क्राइस्टचर्च येथे झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी इसिस आणि त्यांचे गट ही योजना आखत आहेत. क्राइस्टचर्चमध्ये हा हल्ला आॅस्ट्रेलियन नागरिक ब्रँटन टॅरेंट याने घडवून आणला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.