स्फोट आरडीएक्समुळे झाल्याची शक्यता?
By admin | Published: September 14, 2015 01:28 AM2015-09-14T01:28:34+5:302015-09-14T01:28:34+5:30
मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा,
नवी दिल्ली/औरंगाबाद/झाबुआ : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे. या स्फोटात ९० जण ठार आणि शंभरावर लोक जखमी झाले आहेत.
महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना मोहन प्रकाश म्हणाले, एवढा भीषण स्फोट एका सिलिंडरमुळे झाला असेल, यावर विश्वास बसत नाही. हा स्फोट आरडीएक्स किंवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे झाला असणार. कारण या स्फोटात चार बहुमजली इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याचा तपास केला पाहिजे.
दरम्यान, स्थानिक भाजपा नेत्याला नियम धाब्यावर बसवून वर्दळीच्या भागात स्फोटके साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आल्यामुळेच हे भीषण स्फोटकांड घडले, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी नवी दिल्ली येथे केला. ‘मुख्यमंत्र्यांनी आरोपींविरुद्ध कोणती कारवाई केली? चौहान यांच्या राजवटीखालील मध्यप्रदेश आता ‘मृत्यूचे राज्य’ बनले आहे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.
हे कसे घडले? भाजपाच्या व्यापार मंडळाचा जिल्हा प्रमुख पेटलावदच्या मध्य भागात हा स्फोटकांचा कारखाना चालवीत होता.
तो भाजपाचा नेता नसता तर स्थानिक प्रशासनाने त्याला हा कारखाना चालविण्याची परवानगी दिली असती काय, असा सवाल सिंघवी यांनी केला. आता चौहान यांच्या राजवटीत व्यापमं घोटाळ्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता हे शंभर लोक मारले गेले आहेत, असे ते म्हणाले.
पेटलावद येथील भीषण स्फोटानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना प्रक्षुब्ध जमावाचा विरोध आणि रोषाचा सामना करावा लागला. रविवारी सकाळी १० वाजता चौहान यांचा ताफा पेटलावदच्या शासकीय रुग्णालयाजवळ दाखल होताच जमाव संतप्त झाला.
यावेळी जमावाने चौहान यांना घेराव केला आणि प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली. लोकांचा रोष लक्षात घेऊन स्वत: चौहान हे कारमधून उतरले आणि रस्त्यावर बसले. यावेळी त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या स्फोटाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)