मंत्रिमंडळ बदलाची शक्यता तूर्त नाही
By admin | Published: May 11, 2016 03:28 AM2016-05-11T03:28:43+5:302016-05-11T03:28:43+5:30
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची वा खांदेपालट, बदल यांची चर्चा मात्र होताना दिसत नाही.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची वा खांदेपालट, बदल यांची चर्चा मात्र होताना दिसत नाही. मंत्री आणि खासदार या दोन वर्षांतील सरकारची कामगिरी आणि संसदेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी अडविलेले कायदे आणि कल्याणकारी योजनांची माहिती द्या, अशा सूचना मंगळवारी खासदारांना दिल्या.
खासदार व मंत्री यांच्या एकूणच कामाचा आणि विशेषत: दोन महिन्यात ते मतदारसंघात ज्या पद्धतीने वातावरण तयार करतात, याचा आढावा, स्वत: पंतप्रधान करणार आहेत. तोपर्यंत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची अजिबात शक्यता नाही. हे खासदार पक्षाचा आणि सरकारचा कितपत प्रभावीपणे प्रचार करतात , हे पाहून मंत्रिमंडळातील बदलांचा विचार होण्याची शक्यता दिसत आहे.
मोदी यांना मंत्रिमंडळात बदलांची घाई नाही, असे दिसत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात, हे ते पाहणार आहेत. त्यानंतर ११ व १२ जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यावेळी पक्षात आवश्यक ते बदल केले जातील, असे दिसते. त्यानंतर राज्यसभेत पाठवण्याच्या पंधरा जणांविषयीही निर्णय होईल. तोपर्यंत मंत्रिमंडळात बदलांची शक्यता नाही.
सुषमा स्वराज यांची प्रकृती आणि पुन्हा गोव्यात जाण्यास उत्सुक असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या पंतप्रधानांसाठी चिंतेच्या बाबी आहेत. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रसाद रुडी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की नरेंद्र मोदी बैठकीत सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलले. सगळ््या मंत्र्यांनी देशातील महत्वाच्या २०० ठिकाणी जाऊन सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांना माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. सरकार कोणते कायदे करू इच्छिते व कोणत्या लोकांमुळे अडथळे आले हेदेखील खासदार मंडळी लोकांना जाऊन सांगणार आहेत.