भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता
By admin | Published: October 27, 2016 11:48 AM2016-10-27T11:48:47+5:302016-10-27T11:48:47+5:30
धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच हा दौरा प्रस्तावित आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच हा दौरा प्रस्तावित आहे. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होतं. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिली आहे. चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने सोमवारी म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी यासाठी आमंत्रण पाठवलं होतं.
चीनचे वरिष्ठ सरकारी अधिकारी यांग जिएची हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे. भारतासोबत सुरु असलेल्या सीमावाद प्रकरणी ते विशेष प्रतिनिधी आहेत. चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.