कांदा पुन्हा रडविण्याची शक्यता
By admin | Published: July 1, 2015 01:22 AM2015-07-01T01:22:50+5:302015-07-01T01:22:50+5:30
पुढच्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठोक आणि किरकोळ
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
पुढच्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठोक आणि किरकोळ बाजारात आतापासूनच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.
दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये कांद्याच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात लाक्षणिक वाढही केलेली आहे आणि प्रसंगी कांद्याची आयात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तथापि ‘साठा मर्यादे’बाबत (स्टॉक लिमिट) कृषी आणि वित्त मंत्रालयाने वेगवेगळे मत दिल्यामुळे सरकारही संभ्रमात सापडले आहे.
आज बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काही ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारने या वर्षासाठी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन २५० डॉलरवरून वाढवून ते ४२५ डॉलर केले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
कांद्याच्या उत्पादनात होणारी संभाव्य घट आणि त्यामुळे किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहक कामकाज मंत्रालयाने कांद्याचा साठा करून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या संदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केलेली आहे. कृषी मंत्रालयाने या कॅबिनेट नोटवर आपली टिप्पणी केलेली आहे. खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करून, कांद्याचा साठा करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या प्रस्तावावर कृषी मंत्रालयाने सहमती दर्शविली आहे. तथापि, साठा क्षमता वाढविणे अनावश्यक असल्याचे मत वित्त मंत्रालयाने व्यक्त केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यावरून महाराष्ट्रासह अन्य काही कांदा उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यामुळे कांदा निर्यातीत घट होणार असली तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट कांद्याचा पुरवठा वाढला आहे आणि त्यामुळे किमतीतही घट झाली आहे, असा दावा सरकारने केला.