हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याची शक्यता
By admin | Published: July 28, 2016 12:24 PM2016-07-28T12:24:52+5:302016-07-28T12:24:52+5:30
हवाई दलाच्या बेपत्ता एन-32 विमानाच्या शोधमोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरात विमानाचे काही अवशेष सापडले आहेत, तपास सुरु असल्याचं मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
रामेश्वरम, दि. 28 - हवाई दलाच्या बेपत्ता एन-32 विमानांचे काही अवशेष सापडले असल्याची शक्यता आहे. शोधमोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरात विमानचे काही अवशेष सापडले आहेत. गेले 6 दिवस विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सापडलेले अवशेष बेपत्ता विमानाचेच आहेत का, याचा तपास केला जात असल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दल या मोहिमेत सहभागी असून, एक पाणबुडी, आठ विमाने आणि 13 नौका या विमानाचा शोध घेत आहेत. खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधमोहिमेत खूप अडथळे येत होते.
लष्करी साहित्याची वाहतूक करणारे हे विमान शुक्रवारी हवाई दलाच्या चेन्नई येथील तांबरम तळावरून उडाले होते. ते पोर्टब्लेअरला उतरणार होते. तथापि, उड्डाणानंतर अवघ्या 16 मिनिटांतच ते रडारवरून गायब झाले. विमानाशी शेवटचा संपर्क झाला, तेव्हा सकाळचे 8.46 वाजले होते. त्यानंतर, त्याचा कोणताच ठाकठिकाणा लागलेला नाही. तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे.
विमानात 29 व्यक्ती आहेत. त्यात ४ लष्करी अधिकारी असून, ६ चालक दल सदस्य आहेत. त्यात 2 पायलटांचा समावेश आहे. विमानात हवाई दलाचे एकूण 11 जण, लष्कराचे 2, तटरक्षक दलाचा 1 आणि नौदलाचे 9 जण आहेत.