प. बंगालमध्ये लवकरच पोटनिवडणुकीची शक्यता, ममतांच्या भवितव्याचाही लवकरच फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:26 AM2021-08-15T07:26:30+5:302021-08-15T07:26:58+5:30
by-election in West Bengal : राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे दैनंदिन नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा पोटनिवडणूक घेण्याची शक्यता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत यश प्राप्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून पराभूत झाल्या होत्या. भाजपचे नेते आणि एकेकाळी ममतांचे अतिशय विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. मात्र, ममतांचीच विधिमंडळ समितीने एकमताने मुख्यमंत्रीपदी निवड केली. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांमध्ये अर्थात नोव्हेंबरपर्यंत विधिमंडळाचे सदस्यत्व प्राप्त करणे आवश्यक आहे.