देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता
By admin | Published: June 19, 2015 03:28 AM2015-06-19T03:28:34+5:302015-06-19T03:28:34+5:30
लोकशाही व्यवस्था चिरडू शकणाऱ्या शक्तींचे बळ वाढले असून देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते
नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था चिरडू शकणाऱ्या शक्तींचे बळ वाढले असून देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ असताना अडवाणी यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
मोदींवर लक्ष्य साधण्यासाठीच अडवाणी यांनी हे विधान केले असल्याची चर्चा असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मात्र हा तर्क फेटाळला आहे. दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अडवाणी यांच्या या मताला आपली सहमती दर्शविली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला येत्या २५ जून रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने अडवाणी यांनी मुलाखतीत आणीबाणीबाबतची भीती अधोरेखित केली आहे.
काय म्हणाले अडवाणी
-सद्य:स्थितीत संवैधानिक आणि कायद्याचे संरक्षण असतानाही लोकशाही चिरडण्याची क्षमता असलेल्या शक्तींचे बळ वाढले आहे. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळानंतर नागरिकांच्या स्वातंत्र्यावर पुन्हा गदा येऊ नये याची शाश्वती देणारे कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार नाही असे मी खात्रीने सांगू शकत नाही, असे परखड मत देशाचे उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांनी मांडले आहे.
-आपल्या राजकीय नेतृत्वात लोकशाहीबद्दलची निष्ठा आणि कटिबद्धता जाणवत नाही, अशी खंत व्यक्त करताना अडवाणी म्हणाले की, देशात पुन्हा आणीबाणी अथवा व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणारी परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत आश्वस्त करणारी कुठलीही लक्षणे आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसत नाहीत. याचा अर्थ आपले राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असे मला म्हणायचे नाही; परंतु त्यातील उणिवांमुळे माझा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आणीबाणीची परिस्थिती पुन्हा येणार नाही याची खात्री वाटत नाही.
अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रियांचा पाऊस
-अडवाणी यांच्या आणीबाणीसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून विविध विरोधी पक्षांनी त्यांच्या या मताशी सहमती दर्शविली आहे. अडवाणींनी अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केले असल्याचा विरोधकांचा तर्क आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र याचा इन्कार केला आहे.
-लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. भाजपच्या मार्गदर्शक मंडळातही त्यांचा समावेश आहे. त्यामुळे गरज वाटल्यास ते मोदींशी थेट बोलू शकतात. तेव्हा या मुलाखतीच्या माध्यमाने मोदींना काही संदेश देण्याचा त्यांचा विचार असावा असे वाटत नाही.
मा.गो. वैद्य, आरएसएसचे विचारवंत
- अडवाणी व्यक्तींचा नव्हे, तर संस्थांचा उल्लेख करीत होते, असे मला वाटते. त्यांच्या मतांचा मी आदर करतो; परंतु व्यक्तिश: मला देशात पुन्हा आणीबाणी लागू होण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. तो काळ गेला. आता भारतीय लोकशाही फार बळकट झाली आहे.
-एम.जे. अकबर, प्रवक्ता,भाजप
-भाजपतूनच ज्युरी समोर आली आहे. अडवाणी कुणाबाबत बोलताहेत हे अगदी स्पष्ट आहे. त्यांना भाजपत राजनेत्याचा दर्जा असल्याने ते पंतप्रधानांचा नामोल्लेख करू इच्छित नाहीत; परंतु त्यांचा संकेत मोदींकडेच होता हे मुलाखत वाचल्यानंतर स्पष्ट होते.
टॉम वड्डकन, प्रवक्ता, काँग्रेस
-लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना वाटणाऱ्या चिंतेचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणीबाणीच्या परिस्थितीचा जेथवर प्रश्न आहे, तर आम्ही दररोज अशा स्थितीचा सामना करीत आहोत.
-नितीशकुमार,
मुख्यमंत्री,बिहार
-अडवाणी खरे तेच बोलले. आणीबाणीची शक्यता फेटाळता येणार नाही. याचा पहिला वापर दिल्लीत होणार काय?
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली