दक्षिण आणि पूर्व भारतात अतिवृष्टीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:00 AM2018-06-12T06:00:47+5:302018-06-12T06:00:47+5:30
उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, तसा इशारा नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीने (एनडीएमएन) दिला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, तसा इशारा नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीने (एनडीएमएन) दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ व ओडिशासह दक्षिण भारतातील अनेक भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांत वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील पूर्वेकडचा काही भाग, बिहार व झारखंडमध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. कर्नाटक किनारपट्टी, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, केरळ, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, झारखंड व छत्तीसगढ आदी राज्यांत दोन दिवसांत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बंगालची खाडी, बांगलादेश व त्रिपुरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.