रेल्वे तिकीटात 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
By admin | Published: May 4, 2017 10:06 AM2017-05-04T10:06:14+5:302017-05-04T10:21:00+5:30
एका महिन्यात एक टक्का भाडं वाढवण्यापासून ते एकाच वेळी दहा टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - येणा-या दिवसांमध्ये रेल्वे तिकीटात वाढ होण्याची शक्यता आहे. तिकीट दर वाढवण्यासाठी रेल्वेसमोर पाच वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये एका महिन्यात एक टक्का भाडं वाढवण्यापासून ते एकाच वेळी दहा टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंबंधी निर्णय अद्याप झाला नसून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूच अंतिम निर्णय घेणार आहेत. आलेल्या प्रस्तावांमध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमधील फ्लेक्सी फेअर योजना रद्द किंवा कमी करण्यात यावी असंही सुचवण्यात आलं आहे.
"रेल्वे भाडं वाढवण्यासंबंधी पाच प्रस्ताव आले आहे. रेल्वेला तिकीटातून मिळणा-या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ही वाढ करण्यात येणार आहे. मात्र अद्याप यासंबंधी निर्णय झालेला नाही", अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
रेल्वेसमोर ठेवण्यात आलेले प्रस्ताव -
1) दर महिन्याला एक टक्का भाडेवाढ
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकाच वेळी सगळी भाडेवाढ करण्याऐवजी एका महिन्यात एक टक्का भाडेवाढ करण्याचा नियम करण्याचा रेल्वे विचार करत आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशावर सगळा भार एकदम पडणार नाही. सोबतच रेल्वेला टीकेचा सामना करावा लागणार नाही. याचा दुसरा फायदा म्हणजे वर्षभरात किमान 12 टक्के भाडेवाढ करता येईल.
2) फ्लेक्सी फेअर योजना बंद करा
एका प्रस्तावात फ्लेक्सी फेअर योजना बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. रेल्वेला या योजनेमुळे वर्षाला जवळपास सहा कोटींचा फायदा होत आहे. पण दुसरीकडे या योजनेमुळे प्रवाशांच्या नाराजीलाही सामोरं जावं लागत आहे. ही योजना पुर्णपणे रद्द तरी करु शकतो किंवा कमी करु शकतो असं बोर्डाचं म्हणणं आहे. म्हणजेच दहा टक्के जागांवर दहा टक्के भाडं वाढवण्याऐवजी पाच टक्केच वाढ करावी
- काय आहे फ्लेक्सी फेअर योजना
या योजनेतंर्गत पहिले १० टक्के सीट्स साधारण दराने विकणे, त्यानंतरचे १० टक्के सीट्स साधारण तिकिट दरापेक्षा १० टक्के जास्त दराने विकणे, त्याच्या पुढील १० टक्के सीट्ससाठी साधारण तिकिट दरापेक्षा २० टक्के अधिक दर आकारणे, त्यापुढील १० टक्के सीट्सला साधारण दरापेक्षा ३० टक्के अधिक दर. असे ५० टक्के अधिक दराने तिकिट
3) एकत्र 10 टक्के भाडेवाढ
तिस-या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे की, जर फ्लेक्सी फेअर योजना रद्द केली जात असेल तर सर्व ट्रेनमधील सर्व डब्यांमध्ये दहा टक्के भाडेवाढ केली जावी. सध्या रेल्वेला तिकीट विक्रीतून 45 कोटींचं उत्पन्न मिळत आहे. दर दहा टक्के भाडेवाढ केली तर साडे चार हजार कोटींचं उत्पन्न मिळेल. दुस-या एका प्रस्तावात पाच टक्के भाडेवाढ करण्याचं सुचवलं आहे.
4) सेकंड क्लासवर ओझं नको
सेकंड क्लासच्या प्रवाशांवर तिकीट दरवाढीचं ओझं टाकू नये असं एका प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार गरीब कल्याण योजनेबद्दल बोलत असतात. अशा परिस्थितीत रेल्वे गरिबांकडे दुर्लक्ष करत असल्याचा संदेश जाऊ नये. मात्र दुसकीकडे काही जणांनी सेकंड क्लासच्या भाड्यात कमी का होईना पण वाढ झाली पाहिजे असं म्हटलं आहे.