मोठी बातमी! जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर खात्याकडून अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:46 PM2022-08-02T14:46:06+5:302022-08-02T14:55:46+5:30
Ayman al-Zawahiri: अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल-कायदाशी संबंधित संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारणपणे जेव्हा-जेव्हा अल-कायदाचा नवीन उत्तराधिकारी आपली जागा सांभळतो. त्यानंतर अल-कायदाने विविध ठिकाणी हल्ले घडवून आणल्याचे याआधी दिसून आले.
लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला
२०११ साली ओसामा बिन लादेन याची हत्या करण्यात आली. त्यानंतरही दूतवासावर हल्ला करणं, विविध शहरांवर हल्ला करण्याचे प्रयत्न अल-कायदाकडून करण्यात आले. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतरही अशाच प्रकारचे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अल-कायदा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असते. त्यामुळे या संघटनेचे जे स्लिपरसेल्स आहेत, त्यांना सक्रिय करण्याचे आदेश अल-कायदा देऊ शकतं, अशी माहिती समोर येत आहे.
Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं! https://t.co/OgNIiIdoem#zawahri
— Lokmat (@lokmat) August 2, 2022
दरम्यान, २०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही, असे जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या सायंकाळच्या भाषणात जाहीर केले.
जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे.