‘एक पद, एक पेन्शन’ लागू होण्याची शक्यता
By Admin | Published: September 4, 2015 10:34 PM2015-09-04T22:34:38+5:302015-09-05T08:33:42+5:30
केंद्र सरकारतर्फे ‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या संदर्भात पुढील आठवड्यात एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे ‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या संदर्भात पुढील आठवड्यात एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.
‘केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘एक पद, एक पेन्शन’ लागू करण्याची एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. ते आमच्या शर्ती आणि अटींप्रमाणे असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू आणि सरकारचे आभार मानू; परंतु तसे नसेल तर सरकारची ही एकतर्फी घोषणा आम्हाला अमान्य असेल. आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू,’ असे भारतीय माजी सैनिक आंदोलनाचे अध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंग यांनी म्हटले आहे.
ओआरओपी लागू करण्याची तारीख १ जुलै ठेवणार असल्याचे आम्ही ऐकले आहे. पण ही तारीख आम्हाला मान्य नाही. ओआरओपीचे दरवर्षी किंवा द्विवार्षिक पुनरावलोकन केले जावे आणि ते १ एप्रिल २०१४ पासून लागू व्हावे, असे सतबीरसिंग म्हणाले. ओआरओपी लागू करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी गेल्या ८२ दिवसांपासून जंतरमंतर येथे साखळी उपोषण प्रारंभ केले आहे. (वृत्तसंस्था)