पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे भारतावर हल्ला करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 12:26 AM2018-10-13T00:26:10+5:302018-10-13T00:26:22+5:30
पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नौदल व तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
या संघटनांनी सागरी मार्गाने घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी जून महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. मुंबईत २००८ मध्ये अशा प्रकारेच हल्ले चढविण्यात आले होते. त्याच घटनांची पुनरावृत्ती भारतात अन्य ठिकाणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खोल समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण जैश-ए-मोहम्मदकडून सध्या दहशतवाद्यांना दिले जात आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी नौदलाने १० दहशतवाद्यांना पोहण्यापासून अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले होते. या हल्ल्याच्या कटातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याची तपास यंत्रणेकडून २०१० मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यात ही बाब उजेडात आली. बलुचिस्तान मच्छीमार विभागामध्ये नोंदणी झालेल्या अल हुसैनी या ट्रॉलरमधून प्रवास करीत २००८ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर एम. व्ही. कुबेर या भारतीय बोटीवर कब्जा मिळवून ते तिच्याद्वारे मुंबईमध्ये दाखल झाले.
संस्थांआडून कारवाया
फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन, अल दावा वॉटर रेस्क्यूसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या आडून दहशतवादी कारवाया सुरू असतात. या स्वयंसेवी संघटना दहशतवाद्यांना शेखपुरा, लाहोर, फैसलाबाद येथील कालवे तसेच तरणतलाव येथे जून महिन्यापासून पोहण्याचे प्रशिक्षण देत आहेत. खोल समुद्रात कार्गो किंवा तेलवाहू जहाजांचे अपहरण करून त्यांच्या माध्यमातून घुसखोरी करून भारतीय बंदरे व अन्य ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा कट दहशतवादी आखत आहेत.