‘जेईई अॅडव्हान्स’चा अभ्यासक्रम कमी करण्याची शक्यता; पुढील आठवड्यातील बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:28 PM2020-07-11T23:28:01+5:302020-07-11T23:28:36+5:30
आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणू साथीमुळे सर्व शैक्षणिक घडामोडी बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर २0२0 च्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्याचा, तसेच परीक्षा पद्धती बदलण्याचा विचार सुरू असून, ‘इंडियन इन्स्टिट्यूटस् आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) संस्था यावर चर्चा करणार आहेत.
आयआयटी संस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई परीक्षा घेतली जाते. कोविड-१९ साथीमुळे ही परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. आयआयटी संस्थांच्या ‘संयुक्त प्रवेश मंडळा’च्या (जेएबी) आढावा बैठकीत हा मुद्दा विचारार्थ येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. इतरही काही मुद्दे बैठकीत चर्चिले जाणार आहेत.
यंदाची जेईई अॅडव्हान्स आयआयटी-दिल्ली घेणार आहे. आयआयटी-दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील आठवड्यात ‘जेएबी’ची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत जेईई अॅडव्हान्स परीक्षेसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा होईल. परीक्षेची पद्धती, अभ्यासक्रम यासंदर्भातील प्रस्ताव बैठकीत चर्चिले जातील. ‘जेएबी’ने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. जेईई परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार शालेय बोर्डाची १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट यंदा शिथिल केली जाण्याचीही शक्यता आहे.
कोविड-१९ साथीमुळे सीबीएसई आणि सीआयएससीई यासह देशभरातील विविध बोर्डांनी यंदा आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
परीक्षा रद्द झाल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे यासंबंधी विविध बोर्डांकडून वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांवर विचार केला जात आहे. प्रत्येक बोर्डाचा फॉर्म्युला भिन्न असेल, तर विद्यार्थ्यांच्या गुणांत समानता असणार नाही. त्यामुळे जेईईसाठी ते कसे ग्राह्य धरायचे ही एक मोठीच समस्या बनणार आहे.
एनटीएकडून अधिकृत दुजोरा नाही
- स्थापित नियमानुसार, आयआयटी संस्थांत प्रवेशासाठी १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण अथवा टॉप २0 पर्सेंटाईल असणे आवश्यक आहे. सीबीएसईने आपल्या अभ्यासक्रमात ३0 टक्के कपात केली आहे. याचा नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) आणि जेईई यांच्यावर गंभीर परिणाम होईल, असे मानले जात आहे. कारण प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमावरच आधारलेला असतो.
- सूत्रांनी सांगितले की, ‘जेईई अॅडव्हान्स’साठी अभ्यासक्रम कमी केल्यास ‘जेईई मेन’चा अभ्यासक्रमही कमी होईल. शाळा योग्य वेळेत उघडल्या गेल्या नाहीत, तर जानेवारी २0२१ मधील जेईई मेन परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणाºया ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) मात्र या वृत्तास कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळू शकलेला नाही.