महाशिवरात्रीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2016 03:51 AM2016-03-06T03:51:03+5:302016-03-06T03:51:03+5:30
महाशिवरात्रीचा उत्सव आणि दिल्लीत सुरू असलेले संसदेचे अधिवेशन या काळात भारतात दहशतवादी हल्ला करून प्रचंड प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती
पठाणकोट : महाशिवरात्रीचा उत्सव आणि दिल्लीत सुरू असलेले संसदेचे अधिवेशन या काळात भारतात दहशतवादी हल्ला करून प्रचंड प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल के. जे. सिंग यांनी व्यक्त केली आहे.
येथे एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र याबाबतीत अधिक काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरू असताना आणि महाशिवरात्रीचा उत्सव देशभर साजरा होत असताना अशा काही कारवाया केल्यास त्याला खूप प्रसिद्धी मिळवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असावा, अशी माहिती आमच्याकडे आली आहे. असे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत.
पठाणकोटवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानची तपास समिती भारतात येणार असल्यासंबंधात विचारता ते म्हणाले की, त्या समितीने कोठे जायचे आणि कोठे त्यांना जाऊ द्यायचे नाही, हे आम्ही ठरवू. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> भारत-पाक सीमेवर तीस मीटर लांबीचे भुयार खणल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व सीमा भागांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी गृहमंत्रालय व सुरक्षा दलांची समिती तयार केली आहे. भुयार शोधल्यामुळे दहशतवादी कृत्याचा प्रयत्न आपोआपच उधळला गेला आहे, असे लेफ्टनंट जनरल के. जे. सिंग म्हणाले.