भारत-चीन संबंध आणखी बिघडण्याची शक्यता!अमेरिकी गुप्तहेर खात्याचे म्हणणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:35 AM2018-02-15T01:35:25+5:302018-02-15T01:36:38+5:30
भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला.
नवी दिल्ली : भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. कोट्स पुढे म्हणाले की, भारत व चीन दरम्यान डोकलामवरुन वाद निर्माण झाला होता. या प्रश्नावर दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली.
अखेर आॅगस्टमध्ये डोकलाममधून आपापले सैन्य मागे घेण्यास ते
राजी झाले. असे असले तरी
अजूनही भारत व चीन यांच्यातील तणाव संपलेला नसून भविष्यात
तो आणखी वाढण्याची शक्यता
आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्रालय व सरकारी प्रसारमाध्यमे भारताच्या विरोधात सतत आगपाखड करीत असून त्यामुळे या दोन देशांतील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. भारत व चीनने संयम बाळगला, तर या तणावात भर पडणारही नाही. परंतु असे होणे जरा अशक्यच दिसते असे सांगून डॅन कोट्स पुढे म्हणाले की, भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवर चीनने आक्षेप
घेतला होता. अरुणाचल प्रदेशवर भारताचा कोणताही हक्क नसून तो दक्षिण तिबेटचा भाग आहे. त्यामुळे
तो आमचाच प्रदेश आहे असा
दावा चीनने नेहमीच केला
आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांच्यात सीमाप्रश्नासंदर्भात चर्चेची विसावी फेरी नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी
२२ डिसेंबर रोजी पार पडली. त्याच्या थोडे आधी चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशची सीमा ओलांडून २०० मीटर आतपर्यंत घुसखोरी करण्याचा प्रकार घडला होता. त्याआधी डोकलाम वाद उफाळून आला.
पाकशीही चकमकी सुरूच राहातील
भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार आहेत. पाकस्तानातील दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करून हल्ले चढविणे सुरूच ठेवले, तर त्याच्या परिणामी दोन्ही देशांच्या सैन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही चकमकी सुरूच राहातील, असेही डॅन कोट्स यांनी सांगितले.