संयमानंतरचा स्फोट अधिक घातक असू शकतो, चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात भारताला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:31 AM2017-08-28T02:31:38+5:302017-08-28T02:32:30+5:30
भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.
सौरभ कुमार
मुंबई : भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.
संघर्षाच्या प्रारंभिक टप्प्यात संयम ठेवणे ही आमची संस्कृती आहे; मात्र संयमानंतरचा स्फोट हा विजेसारखा असू शकतो, असा इशारा चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात देण्यात आला आहे. भलेही चीनने ३० वर्षांत मोठे युद्ध केलेले नाही; पण अगदी अटीतटीच्या प्रसंगी प्रत्येक देश युद्धाचा पर्याय स्वीकारतो, असा इशाराही यात देण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, भारताला असे वाटते की, चीनला रस्ता तयार करण्यापासून रोखण्याचा भारताचा निर्धार हा चीनच्या निश्चयाला चिरडून टाकू शकतो. संपूर्ण चीनच्या जनतेची अशी मागणी आहे की, घुसखोरांकडून आमच्या ज्या भागावर ताबा घेण्यात आला आहे तो भाग परत घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भारतीय किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय ताकद रोखू शकत नाही. जर पीपल्स लिबरेशन आर्मीने हल्ला केला, तर भारत त्याचा राजकीय आणि आर्थिक परिणाम सहन करण्यास सक्षम राहणार नाही. अशा परिस्थितीत भारताला फायदाच होईल, असा अंदाज काही भारतीय संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत असले तरी तो एक विनोद ठरेल.
भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये ७० दिवसांपासून तणाव आहे. यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या भागात सैन्य कायम राहील अशी भूमिका भारताने घेतली आहे. त्यावर भाष्य करताना या लेखात म्हटले आहे की, चीनची ताकद ओळखण्यात भारत गंभीर चूक करीत आहे. भारतीय सुरक्षा अधिकाºयांच्या हवाल्याने भारतातील मीडियाने असे वृत्त दिले आहे की, चीन युद्धाची जोखीम स्वीकारणार नाही. छोट्या संघर्षालाही चीन घाबरतो, पण वेळ आली, तर प्रत्येक देश युद्धासाठी तयार असतो, असेही यात म्हटले आहे.
(लेखक निवृत्त आयएफएस अधिकारी असून त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्ना येथील कार्यालयात राजदूत म्हणून काम केलेले आहे. बंगळुरुच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स स्टडीज’मध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)