पोस्ट ग्रॅज्यूएट महिला पाकिटमाराला अटक
By admin | Published: June 1, 2017 12:01 PM2017-06-01T12:01:03+5:302017-06-01T12:18:48+5:30
फ्लुएंट इंग्रजी बोलणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएट असलेल्या महिलेने जर पाकिट मारलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल.
Next
ऑनलाइन लोकमत
हावडा, दि. 1- रस्त्याने चालताना, ट्रेनमधून किंवा बसने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या खिशातील पैशांची पाकिटं चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकत असतो. अनेकदा न शिकलेली किंवा बेरोजगार व्यक्ती अशी कामं करत असते. पण फ्लुएंट इंग्रजी बोलणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएट असलेल्या महिलेने जर पाकिट मारलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. असाच आश्चर्यकारक प्रकार बुधवारी पश्चिम बंगालमधील हावडा शहरात एका बसमध्ये घडला आहे. एका महिलेच्या पर्समधून पाच हजार रूपये चोरल्याप्रकरणी अंजली रॉय आणि पूजा रॉय या दोन पोस्ट ग्रॅज्यूएट झालेल्या महिला पाकिटमारांना पोलिसांनी अटक केली आहे.
31 मे रोजी म्हणजेच बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सेरामपूर ते कुलगछीया दरम्यान बसमध्ये हा प्रकार घडला होता. स्वम्पा नावाची एक महिला आपल्या पतीसह बसमधून प्रवास करत होती. उलुबेरीयातील घुलीसानी येथे त्यांना जायचं होतं. बसमध्ये स्वम्पा मधल्या सीटवर बसली होती. अंजली आणि पूजा तीच्या दोन बाजूला येऊन बसल्या. स्वम्पाचं बस स्टॉप जवळ येताच अंजली आणि पूजा सिग्नलवर उतरण्यासाठी दरवाजाजवळ गेल्या. त्या दोघींची सिग्नलवर उतरण्याची घाई बघून स्वम्पाने तीची पर्स तपासली. त्यावेळी आपल्या पर्समधील पाच हजार रूपये गायब झाल्याचं स्वम्पाच्या लक्षात आलं. तेव्हा स्वम्पाने दरवाजाजवळ धाव घेतली आणि अंजलीवर चोरीचा आरोप लावला. चोरीच्या आरोपामुळे चिडलेल्या अंजलीने फ्लुएंट इंग्रजीत स्वम्पासोबत वाद घालायला सुरूवात केली. सभ्य आणि उच्चशिक्षित महिलेवर चोरीचा आरोप करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल अंजलीने स्वम्पाला केला.
जर माझ्याकडे पैसै सापडले नाहीत तर सगळ्यांच्या समोर तुला माफी मागावी लागेल, अशी अट अंजलीने ठेवली. ही अट मान्य करत बसमधील इतर प्रवाशांनी आणि स्वम्पाने तीला तिचे दोन्ही हात वर करायला लावले असताना अंजलीने साडीत लवलेला पैशांचा गठ्ठा खाली पडला. यानंतर अंजली आणि पूजा दोघींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
पोलिसांच्या चौकशीमध्ये या दोघींनीही गुन्ह्याची कबूली दिली आहे. अंजलीने सात-आठ महिन्यापूर्वी पूजाला पाकिटमारीच्या कामात आणलं होतं. उत्पनाचं कोणतंही साधन न मिळाल्याने मी प्रवाशांची पाकिटं मारायला सुरूवात केली होती अशी कबूली अंजलीने दिली आहे. "अंजलीला तीच्या पतीने सोडलं होतं आणि आई-वडीलांसह बर्दवानमध्ये राहायला भाग पाडलं होतं, म्हणुन ती पाकिटमारीचं काम करते आहे, अशी माहिती चौकशी दरम्यान अंजलीने पोलिसाना दिली आहे. विशेष म्हणजे अंजलीचं एमए झाल्याची माहिती तीने पोलिसांना दिली आहे.