पोस्ट ऑफिस खाती डिजिटल होणार; अर्थ मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 04:30 PM2018-04-08T16:30:14+5:302018-04-09T01:15:24+5:30
सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क तयार होईल.
देशातील जवळपास 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार आहेत. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमधील बचत खाती इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेला (आयपीपीबी) लिंक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्वांना डिजिटल बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.
अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमधील खात्यांना आयपीपीबीला लिंक करण्याची परवानगी दिल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता पोस्ट ऑफिसचे खातेधारक आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. 34 कोटी बचत खात्यांपैकी 17 कोटी पोस्ट ऑफिस बचत खाती आहेत. तर उर्वरित खाती मासिक उत्पन्न योजना आणि आरडी या प्रकारात मोडतात.
सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क तयार होईल. भारतीय पोस्ट खात्यांतर्गत येणाऱ्या 1.55 लाख कार्यालयांना आयपीपीबीला लिंक करण्याची योजना असल्याने देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क उभे राहिल. 'आयपीपीबी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येते. तर पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सुविधा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. सध्या इतर बँकेचे ग्राहक या सेवांचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिस बचत खाती आयपीपीबीला लिंक झाल्यावर सर्व खातेधारक इतर बँकांच्या ग्राहकांप्रमाणे रोख हस्तांतरण सेवेचा वापर करु शकतात,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाती असलेल्या सर्वांना या सेवेचा लाभ घेता येईल. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे ती स्वीकारायची की नाही, याची निवड ग्राहकांना करता येईल.
पोस्ट पेमेंट बँकेच्या ६५० शाखा
पोस्ट आॅफिस ६५० आयपीपीबी शाखांचे काम सुरू करण्याचा विचार करत आहे. या सर्व ६५० शाखा जिल्ह्यातील छोट्या पोस्ट कार्यालयांना जोडलेल्या असतील. आयपीपीबी शाखा पोस्टाच्या नेटवर्कशी जोडल्या जातील. एकूण १.५५ लाख पोस्ट आॅफिस आहेत. यातील १.३ लाख शाखा ग्रामीण भागातील आहेत. १.५५ लाख शाखांसह पोस्ट हे भारतातील सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क बनत आहे. दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरपासून खातेधारक सुकन्या समृद्धी योजना, ठेवी, स्पीड पोस्ट, यासाठी आयपीपीबी खात्यातून पैसे डिपॉझिट करू शकतील.
कोणते व्यवहार करता येणार?
आयपीपीबीचा ग्राहक एनईएफटी, आरटीजीएस आणि अन्य मनी ट्रान्सफर सेवेचा उपयोग करू शकतात. एकदा पोस्ट आॅफिस सेव्हिंग बँक खाते (पीओएसबी) आयपीपीबीशी लिंक केले की, खातेदार अन्य बँकांसोबत मनी ट्रान्सफरची सेवा घेऊ शकतो. खातेधारकांनी ही सेवा निवडली, तर त्यांचे खाते आयपीपीबीशी जोडले जाईल.