अमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार -  खासदार ए. टी. नाना पाटील        

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 04:30 PM2018-05-23T16:30:23+5:302018-05-23T16:30:23+5:30

केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार असल्याची माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिली.  

Postal Bank will be started in Amalner, Chalisgaon - MP A. T. Nana Patil | अमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार -  खासदार ए. टी. नाना पाटील        

अमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार -  खासदार ए. टी. नाना पाटील        

Next

जळगाव - केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार असल्याची माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिली.  
     भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री. प्रणवकुमार, अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा, डाक अधीक्षक श्री. बी. व्ही चव्हाण, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते. 
     जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून देशात होणाऱ्या प्लॅस्टिक उत्पादनापैकी 16 टक्के उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होते. तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी विदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यक भासत असत. त्यावेळी त्यांना मुंबई, औरंगाबाद, नाशिक येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. आता जळगाव शहरात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाल्याने या  विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. केंद्र शासन  नागरीकांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देत असते. या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन आता केंद्र शासनाने अशा लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्टल बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकेच्या माध्यमातून देशातील सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते या बँकेत उघडण्यात येणार असून त्यांना मिळणारे अनुदान व इतर लाभ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच या बँकेमार्फत खातेदारांच्या ठेवी स्वीकारण्यात येणार असून केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणारा कर्जपुरवठाही या बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या बँकेच्या शाखा पहिल्या टप्प्यात अमळनेर व चाळीसगाव येथे सुरु होणार असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे यासाठी सन 2009 पासुन प्रयत्न करीत होतेा. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांच्या माध्यमातून सर्व भागांचा समान विकास करण्याचे धोरण आखले आणि शासन नागरीकांच्या दारी या उपक्रमातंर्गत जळगाव शहरात उडान योजनेतंर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली. आता पासपोर्ट सेवा केंद्रही सुरु झाले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी. यासाठी जिल्ह्यात भुदल व नौदलाची विशेष भरती मोहिम राबविण्यात आली. चाळीसगाव येथे सैन्य भरती केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले. 
शहराच्या नवीन भागात पोस्ट कार्यालय सरु करावे-आमदार भोळे
     जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून जिल्ह्याची दिवसेदिवस प्रगतीकडे वाटचाल सुरु असताना या पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ नागरीकांना होणार आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नवीन भागात पोस्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली. 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होत असल्याचा आनंद वेगळा
                                                             - डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी
    भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी म्हणाल्या की,  केंद्र शासनाने विदेश मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व केळी पिकविण्यात देशात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होत असल्याचा आनंद वेगळा आहे. पूर्वी देशभरात फक्त्‍ 36 पासपोर्ट कार्यालये होती. आता 92 कार्यालये सुरु झाली असून जळगावचे डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र हे देशातील 210 वे सेवा केंद्र असून अजिंठा लेणी जवळ असल्याने तसेच जळगावात एज्युकेशन हब, औद्योगिक हब व मेडिकल हब होत असल्याने या पासपोर्ट सेवा केंद्रास महत्व असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
जळगाव डाक कार्यालयामार्फत नोडल पार्सल सेंटर सुरु करण्यात येणार- प्रणव कुमार
     विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरुना या सेवाकेंद्राचा लाभ होणार आहे. औरंगाबाद डाक विभागातील हे 5 वे सेवा केंद्र आहे. जळगाव डाक कार्यालयामार्फत लवकरच नोडल पार्सल सेंटर सुरु करण्यात येणार असून या सेंटरच्या माध्यमातून नागरीकांना घरपोच पार्सल सेवा देण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी दिली.
     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुरुवातीस डाक विभाग व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुनंदा चौधरी यांनी स्वागतगीत म्हटले. उपास्थितांचे आभार अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा यांनी मानले. कार्यक्रमास सभापती पोपट तात्या भोळे, नगरसेवक उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पासपोर्ट विभाग, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Postal Bank will be started in Amalner, Chalisgaon - MP A. T. Nana Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.