‘काश्मीरच्या आझादी’चे पोस्टर दिसले जेएनयूमध्ये
By admin | Published: March 4, 2017 04:33 AM2017-03-04T04:33:35+5:302017-03-04T04:33:35+5:30
राष्ट्रवाद आणि बोलण्याचे स्वातंत्र्य यावर वाद सुरू असतानाच आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयू) काश्मीरच्या आझादीचे पोस्टर लागले आहेत
नवी दिल्ली : राष्ट्रवाद आणि बोलण्याचे स्वातंत्र्य यावर वाद सुरू असतानाच आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयू) काश्मीरच्या आझादीचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. डाव्यांची विद्यार्थी संघटना डेमोक्रेटिक स्टुडंट युनियनने (डीएसयू) हे पोस्टर लावल्याचे सांगितले जात आहे.
जेएनयू परिसरात लागलेल्या या पोस्टरवर काश्मीर तसेच मणिपूरला स्वातंत्र्य, पॅलेस्टाइनमध्ये मुक्त वातावरण, जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. स्कूल आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हे पोस्टर बघितले आणि प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने हे पोस्टर हटविण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. याबाबत बोलताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे पोस्टर येथे कोणी लावले याची माहिती नाही. विद्यापीठ परिसरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
जेएनयूतील विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी मागील वर्षी अफझल गुरूच्या फाशीच्या निषेधार्थ विद्यापीठ परिसरात आंदोलन केले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासह या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र कन्हैया कुमारवरील आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. हे विद्यार्थी सध्या जामिनावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पोस्टर जुनेच?
जेएनयूतील पोस्टरबाबत कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तर हे पोस्टर नेमके कधी लावले गेले याबाबतही वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. हे पोस्टर एक वर्षापासून येथे असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, तर पोस्टर तीन-चार महिन्यांपूर्वी लावले गेले असल्याचे काही जण सांगतात. रामजस कॉलेजमधील वादाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरकडे आता लक्ष गेले असल्याचे सांगितले जात आहे.
गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने अभाविपच्या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर या वादात राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता या पोस्टरने नव्या वादाला तोंड फोडले आहे.