अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 08:59 PM2020-01-25T20:59:58+5:302020-01-25T21:27:56+5:30
सात जणांना पद्मविभूषण जाहीर; पद्मभूषण पुरस्कारासाठी १६ जणांची निवड
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे. यंदा सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मॉरिशसचे माजी पंतप्रधान अॅनरुड जुगनॉथ, बॉक्सिंगपटू मेरी कोम, चन्नूलाल मिश्रा, विश्वेष तीर्थ स्वामी (मरणोत्तर) यांचादेखील पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारनं यंदा पद्मविभूषण सन्मानासाठी सात जणांची निवड केली आहे. तर पद्मभूषण पुरस्कारासाठी १६ जणांची निवड केली आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह उद्योगपती आनंद महिंद्रा, वेणू श्रीनिवासन, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, नागालँडचे माजी मुख्यमंत्री सी. जे. जमीर, जम्मू काश्मीरमधले नेते मुझफ्फर हुसेन बेग यांच्या नावाचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारनं ११८ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये झहीर खान, पोपटराव पवार, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, राहीबाई पोपेरे, सुरेश वाडकर, कंगना राणौत, अदनान सामी, एकता कपूर यांचा समावेश आहे. याशिवाय बेंबेम देवी (फुटबॉल), एम. पी. गणेश (हॉकी), जीतू राय (नेमबाजी), तरुणदिप राय (तिरंदाजी), राणी रामपाल (हॉकी) यांनादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.