२१ लाख खातेदारांच्या घरी पोस्टमननी पोहचविली ४१२ कोटींची रोख रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:45 AM2020-04-27T03:45:14+5:302020-04-27T03:45:23+5:30
जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेत एक क्रांतिकारक गोष्ट घडली आहे. एखाद्याचे खाते कोणत्याही बँकेत असो व तिची शाखा तुमच्या गावात किंवा शहरात नसली तरीदेखील जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल. या सुविधेसाठी त्या व्यक्तीचे पोस्टात खाते असणे गरजेचे नाही. अशा रितीने पोस्टाने लॉकडाऊनच्या काळात देशभरात २१ लाख खातेदारांपर्यंत ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम लोकांपर्यंत पोहोचविली आहे.
खातेदारांना ही रक्कम पोस्टमननी २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत पोहोचविली. हे खातेदार मुख्यत्वे ग्रामीण भागातील व जिथे बँकांच्या फारशा शाखा नाहीत, अशा ठिकाणचे रहिवासी आहेत. पोस्टाची देशभरात १.८६ लाख कार्यालये असून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) अंतर्गत आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिमद्वारे (एइपीएस) हे पैसे खातेदारांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे, अशी माहिती पोस्ट खात्याचे सचिव प्रदीप्तकुमार बिसोई यांनी दिली आहे.
>औषधे, पीपीईचाही केला पुरवठा
लॉकडाऊनच्या काळात औषधे, पीपीइ यासारख्या वस्तूही पोस्टामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. विषाणूविरोधातील लढ्यामध्ये पोस्ट खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा बंद असल्याने रुग्णालयांना औषधपुरवठा करण्याचे काम पोस्ट खात्याच्या वाहनांतूनही करण्यात आले. त्यामध्ये दोन लाख पोस्टमन सक्रिय भूमिका बजावत आहेत. आता लोक वीज, पाणी, डीटीएचची बिले किंवा पैशांचे अन्य बँक खात्यात हस्तांतरण आदी कामे आयपीपीबी अॅप किंवा पोस्टमनच्या मदतीने करू शकतात. त्यामुळे पेन्शनर, महिला, गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.