रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या, पोस्टमार्टम अहवालातून झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:28 PM2019-04-19T17:28:33+5:302019-04-19T17:28:41+5:30
रोहित शेखर याची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालामधून उघड झाली आहे.
नवी दिल्ली - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, रोहित शेखर याची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालामधून उघड झाली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी याचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. मंगळवारी रोहित शेखर तिवारी डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, बुधवारी एम्स रुग्णालयात पाच डॉक्टरांच्या टीमने रोहित शेखरच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम केले होते. त्याचा अहवाल अखेर आज समोर आला असून, त्यात रोहित शेखर याचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याची तोंड दाबून हत्या करण्यात आली असावी, असेही या अहवालात म्हटले आहे.
#UPDATE Delhi Police: Postmortem report of late ND Tiwari's son Rohit Shekhar Tiwari reveals 'unnatural death'. Case registered under section 302 of the IPC (murder case) against unknown persons. https://t.co/RI3AMT7KW1
— ANI (@ANI) April 19, 2019
रोहित शेखर मतदान करण्यासाठी कोटद्नारला गेला होता. त्यानंतर सोमवारी रात्री जवळपास अकरा वाजताच्या सुमारास डिफेन्स कॉलनीत असलेल्या त्याच्या घरी परतला. घरी आल्यानंतर जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर झोपायला खोलीत गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शेखर उशिरापर्यंत का झोपला आहे, हे पाहण्यासासाठी खोलीत चार वाजता नोकर गेल्या असता त्याच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आल्यानंतर नोकराने याबाबतची माहिती रोहित शेखरच्या आईला दिली. त्यानंतर त्याला येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेखर सोमवारी साडे अकरा वाजता झोपला होता. घरातील कोणीच 16.30 तासांपर्यंत त्याच्याकडे लक्ष का दिले नाही. त्याची पत्नी सुद्धा या घटनेवेळी घरात होती. याव्यतिरिक्त आणखी लोक घरी होते. पोलीस तपासातून समजते की, रोहित शेखर ज्यावेळी घरात आला होता, त्यावेळी तो नशेत होता. तसेच, झोप येत नाही म्हणून रोहित शेखर अनेकदा झोपेच्या गोळ्या घेत होता. त्यामुळे नशेत त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या असतील आणि त्याचे रिअॅक्शन असेल, असा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांना रोहित शेखरच्या खोलीत भरपूर औषधे आणि रिकामी रॅपर मिळाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची बायपास सर्जरी झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी पाच डॉक्टरांच्या पॅनेलकडून रोहित शेखरच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम केले आहे. तसेच, याची व्हिडिओग्राफी सुद्घा केली आहे. रोहित शेखरच्या आईने किंवा त्याच्या पत्नीने पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यास विरोध केला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
मोठ्या वादानंतर मुलगा म्हणून स्वीकार
रोहित याने 12 एप्रिलला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी होऊन राजकीय इनिंग आजमावणार असल्याचे म्हटले होते. काही वर्षांपूर्वी एन. डी. तिवारी यांचे वयाच्या 89 व्या वर्षीचे लग्न प्रकरण गाजले होते. न्यायालयात बराच काळ चाललेल्या वादानंतर एन. डी. तिवारी यांनी रोहित हा त्यांचाच मुलगा असल्याचे मान्य केले होते. तसेच 89 व्या वर्षी त्यांनी उज्ज्वला यांच्याशी लग्नही केले होते. रोहित हे 2017 मध्ये भाजपामध्ये सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एन डी तिवारी यांचे निधन झाले होते.