आमदाराचे नागरिकत्व रद्द केल्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:26 AM2019-11-23T03:26:23+5:302019-11-23T03:28:35+5:30
गृह मंत्रालयाचा आदेश रद्द करण्यात यावा अशी याचिका चेन्नामनेनी यांनी गुरुवारी न्यायालयात केली होती.
हैदराबाद : तेलंगण राष्ट्र समितीचे आमदार रमेश चेन्नामनेनी यांचे नागरिकत्व रद्द करण्याच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशाला तेलंगण उच्च न्यायालयाने शुक्रवारी हंगामी स्थगिती दिली आहे.
गृह मंत्रालयाचा आदेश रद्द करण्यात यावा अशी याचिका चेन्नामनेनी यांनी गुरुवारी न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती सी. कोंडांडा राम यांनी या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. ‘माझ्या याचिकेवर निकाल लागेपर्यंत त्या आदेशाशी संबंधित इतर प्रक्रियांनाही निलंबित केले जावे,’ असे चेन्नामनेनी यांनी म्हटले आहे.
चेन्नामनेनी यांनी खोटी माहिती देणे/ वस्तुस्थिती लपवून ठेवणे यामुळे भारत सरकारची दिशाभूल झाली, त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे.
‘नागरिकत्वाचा अर्ज करण्यापूर्वी मी भारतात एक वर्ष राहिलो होतो’, असे चेन्नामनेनी यांनी स्पष्ट केले असते तर या मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्याने त्यांना नागरिकत्व मंजूर केले नसते, असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
तेलंगणात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश चेन्नामनेनी हे वेमुलावाडा मतदारसंघातून पुन्हा निवडून गेले आहेत. चेन्नामनेनी यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, त्याच्या आधीच्या १२ महिन्यांत त्यांनी किती वेळा भारताला भेट दिली होती ही माहिती लपवून ठेवल्याबद्दल गृहमंत्रालयाने त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द केल्याचा बुधवारी नव्याने आदेश जारी केला.