पोरी हुश्शार! वडिलांनी बटाटे विकून शिकवलं; लेकींनी कष्टाचं सोनं केलं, झाल्या पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:09 IST2025-01-26T12:08:12+5:302025-01-26T12:09:49+5:30
वडिलांनी बटाटे विकून आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च केला आहे.

पोरी हुश्शार! वडिलांनी बटाटे विकून शिकवलं; लेकींनी कष्टाचं सोनं केलं, झाल्या पोलीस अधिकारी
बिहारमधील नवादा जिल्ह्यातील पाकरीबरावां गावातील दोन बहिणी पूजा आणि प्रिया कुमारी या पोलीस अधिकारी झाल्या आहेत. त्यांच्या वडिलांनी बटाटे विकून आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च केला आहे. गावातील शाळेतून शिक्षण सुरू करून, दोघींनीही कठोर परिश्रम आणि समर्पणाने हे स्थान मिळवलं आहे. त्यांचं यश गरीब कुटुंबातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.
पूजा आणि प्रियाच्या वडिलांनी मुलींना बटाटे विकून शिकवलं. त्यांचं स्वप्न होतं की, त्यांच्या मुली एके दिवशी मोठी भरारी घेतील. मुलींनीही त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. दोघींनीही पोलीस अधिकारी बनून आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव उंचावलं आहे.
दोन्ही बहिणींनी प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेतून केलं. यानंतर त्यांनी कृषक कॉलेजमधून इंटरमिजिएट आणि पदवी पूर्ण केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही, दोघींनीही कधीही हार मानली नाही. त्यांनी आपलं स्वप्न साकार करण्याचा दृढनिश्चय केला होता आणि तसंच केलं.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पूजा आणि प्रिया नवादा येथील त्यांच्या मामाच्या घरी गेल्या. तिथे त्यांचे मामा टिंकू साव यांनी त्यांना शिक्षणात खूप मदत केली. मामा त्यांच्यासाठी प्रेरणास्थान बनले आणि प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली. दोन्ही बहिणी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या मामांना देतात. त्याच्या मामांच्या पाठिंब्याशिवाय हे स्थान मिळवणं कठीण झालं असतं असं त्यांना वाटतं.
पूजा आणि प्रिया यांच्या यशावरून हे स्पष्ट होतं की, कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रबळ इच्छाशक्तीने कोणतेही ध्येय साध्य करता येतं. कितीही अडचणी आल्या तरी. दोन्ही बहिणींनी हे सिद्ध केलं आहे की, मुलीही कोणापेक्षा कमी नाहीत. त्या काहीही साध्य करू शकतात. तुम्हाला फक्त दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे.