जुन्या धरणांपासून धोका वाढण्याची शक्यता; बहुतांश लोकसंख्या धरणांखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:25 AM2021-01-25T05:25:57+5:302021-01-25T05:26:14+5:30
काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
न्यूयॉर्क : भारतात २०२५ मध्ये एक हजाराहून अधिक धरणे सुमारे ५० वर्षांची जुनी होणार असून, जगभरात अशा प्रकारची जुनी धरणे भविष्यात धोका वाढविण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या २०व्या शतकात बांधलेल्या या हजारो धरणांच्या परिसरात वसलेली असेल व धरणे जुनी झाल्यामुळे त्यांना गंभीर धोका निर्माण झालेला असेल. ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर - ॲन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ या शीर्षकाखाली हा अहवाल संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या कॅनडास्थित जल, पर्यावरण व आरोग्य संस्थेने तयार केला आहे. अहवालात म्हटले आहे की, जगभरातील एकूण ५८,७०० मोठ्या धरणांपैकी बहुतांश धरणांचे काम १९३० ते १९७० या कालावधीत झालेले आहे. ५० ते १०० वर्षांसाठी त्यांचे बांधकाम झालेले आहे. काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जुन्या धरणांची दुरुस्ती, देखभालीचा खर्च वाढतो व त्यांची पाणी साठविण्याची क्षमताही कमी होते. २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या या धरणांच्या खाली वसलेली असेल. भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, झांबिया व झिम्बाब्वे या देशांतील धरणांचे अध्ययन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
... तर ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतो
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील एकूण धरणांच्या ५५ टक्के म्हणजेच ३२,७१६ मोठी धरणे चीन, भारत, जपान व दक्षिण कोरिया या चार आशियाई देशांतील आहेत.
यातील बहुतांश धरणे लवकरच ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.
एकट्या भारतात १,११५ मोठी धरणे २०२५ मध्ये ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी होणार आहेत.
देशातील ४,२५० पेक्षा अधिक मोठी धरणे २०५० मध्ये ५० वर्षांपेक्षा जुनी होणार आहेत.
६४ मोठी धरणे २०५० मध्ये १५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.
भारताच्या केरळमधील मुल्लापेरियार धरण १०० वर्षांपूर्वी बनविलेले असेल व त्याला काही झालेच तर सुमारे ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.