दुकानातील भांडी अचानक गडगडली, दुकानदाराने वाकून बघितले आणि बोबडीच वळली, डब्यांवर बसला होता ८ फूट लांब अजगर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 09:04 PM2021-11-18T21:04:54+5:302021-11-18T21:05:13+5:30
Rajasthan News: कोटा शहरातील टिपटा येथील गढ पॅलेसजवळ एका हलवाईच्या दुकानामध्ये अजगर घुसला आणि दुकानातील कपाटावर जाऊन राहिला.
जयपूर - कोटा शहरातील टिपटा येथील गढ पॅलेसजवळ एका हलवाईच्या दुकानामध्ये अजगर घुसला आणि दुकानातील कपाटावर जाऊन राहिला. दुकानामध्ये एकापाठोपाठ एक भांडी पडत असल्याने दुकानदाराने आतमध्ये वाकून पाहिले. वाकून पाहताच दुकानदाराची बोबडीच वळली. सुमारे आठ फूट लांब अजगर डब्यांवर ठाण मांडून बसला होता. त्यानंतर या दुकानदाराने पर्यावरण प्रेमी गोविंद शर्मा यांना बोलावले. गोविंद शर्मा यांनी तिथे येऊन अजगराला पकडले. त्यानंतर या अजगराला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.
सुमारे १० किलो वजनाचा हा अजगर सामानाच्या मागे लपला होता. दुकानातील कर्मचारी घाबरून बाहेर बसले होते. गोविंदने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला. आधी दुकानातील सामान हटवण्यात आले. मात्र नंतर सावधानतापूर्वक अजगराला पकडले. रेस्क्यूदरम्यान, अजगर थोडा आक्रमक झाला. त्याने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले.
सुमारे एक तास प्रयत्न केल्यानंतर हा अजगर पकडण्यात यश आले. गोविंद यांनी सांगितले की, गढ पॅलेसमध्ये अजगरासोबत अन्य साप आहेत. तत्पूर्वीही या परिसामधून पाच सापांना रेस्क्यू करण्यात आले होते. सध्या या परिसरात नाल्याचे खोदकाम सुरू आहे. तसेच गेल्या तीन चार दिवसांपासून या परिसरात एक अजगर दिसला होता.