अनवाणी पायांनी शाळेत जायचा पोल्टू; राष्ट्रपतींच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:34 AM2017-07-18T03:34:55+5:302017-07-18T03:34:55+5:30
तो मुलगा तिसरीत अथवा चौथीत असेल. पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांचे बंडल करुन हातात घ्यायचा. अनवाणी पायांनीच तो मुलगा शेताच्या मार्गाने शाळेत जायचा.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तो मुलगा तिसरीत अथवा चौथीत असेल. पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांचे बंडल करुन हातात घ्यायचा. अनवाणी पायांनीच तो मुलगा शेताच्या मार्गाने शाळेत जायचा. त्या मुलाचे नाव आहे प्रणव मुखर्जी.
राजकीय जीवनात मितभाषी, अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना त्यांच्या मित्र परिवाराने या निमित्ताने उजाळा दिला. प्रणवजी यांचे वडील आणि त्यांच्या मोठ्या भगिनी अन्नपूर्णा यांनी त्यांना पोल्टू या नावाने हाक मारायला सुरुवात केली. पत्रकार आणि प्रणवजी यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र असलेले जयंत घोषाल यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या. जगाच्या पाठीवर टोपणनावाला विशेष महत्त्व आहे. भारतीयांनाही अशा नावाबद्दल खास स्नेह आहे. बंगाली लोकही टोपणनावावर विशेष प्रेम करतात.
रवींद्रनाथ टागोर यांना प्रेमाने रॉबी म्हटले जायचे. सत्यजीत रे यांना माणिक तर, बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चटर्जी यांना बुम्बा या नावाने हाक मारली जायची. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांना मनु म्हटले जायचे असे एका आर्किटेक्टने सांगितले. टोपणनाव ठेवण्याची एक पद्धत भारतात दिसून येते. म्हणजे टोपणनाव काय असावे? ते शोधले जाते. त्या नावाचा अर्थ पुस्तकात शोधला जातो. अंकशास्त्र आणि ज्योतिष यांचाही बऱ्याचदा आधार घेतला जातो. जेणेकरुन नाव उपयुक्त आहे हे निश्चित होईल. फोर्टिस्ट हेल्थकेअरचे मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख चिब्बर म्हणाले की, बहुतांश लोकांसाठी टोपणनावाचा उद्देश मूळ नावाचे संक्षिप्त रूप करणे हाच असतो. बॉलीवूडमधील करिश्माला कुटुंबात लोलो म्हटले जाते.
असे ठरते विशेष नाव...
समाजशास्त्राचे अभ्यासक संजय श्रीवास्तव म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विशेषणांवरुन हे नाव ठरते. त्यामुळेच सोनम कपूरला तिचे वडील जिराफ म्हणतात. भारतात पाश्चिमात्य नावेही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. उत्तर भारतात बॉबी, डॉली असे नावे दिसून येत आहेत.