‘ती पावडर’ पीईटीएन स्फोटकांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:03 AM2017-07-20T02:03:18+5:302017-07-20T02:03:18+5:30
उत्तर प्रदेश विधानसभेत आढळलेली शक्तिशाली स्फोटकांची भुकटी (पावडर) नेमका कोणता स्फोटक पदार्थ आहे, याबाबत राज्य सरकारच्या यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेत आढळलेली शक्तिशाली स्फोटकांची भुकटी (पावडर) नेमका कोणता स्फोटक पदार्थ आहे, याबाबत राज्य सरकारच्या यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे दिसून येते. एकीकडे राज्य सरकारने प्राथमिक चाचणी अहवालानुसार ही भुकटी पीईटीएन या स्फोटक पदार्थाचीच असल्याचा दावा केला केला आहे. तसेच या स्फोटकाच्या भुकटीचा नमुना चाचणीसाठी आग्रा येथील न्यायवैद्यक शास्त्रीय प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरी) पाठविण्यात आला नव्हता, असेही स्पष्ट करीत गृह विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरीच्या चाचणी निष्कर्ष फेटाळून लावला आहे. ही भुकटी पीईटीएन स्फोटक पदार्थाची नाही, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या चाचणीत आढळल्याचे वृत्त आहे.
प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी असेही म्हटले आहे की, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे अशा प्रकारची चाचणी घेण्यासाठी उपकरणेच नाहीत.
लखनौतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या १४ जुलै रोजीच्या चाचणी अहवालानुसार हा पदार्थ अद्राव्य आहे. विविध रासयानिक द्रव्य चाचणीतून यात नायट्रेटही या पावडरीत आढळले आहे. या स्फोटक पदार्थाचे नेमके स्वरूप ओळखण्यासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीतून विधानसभेत आढळलेली पावडर ‘पीईटीएन’असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
लखनौच्या प्रयोगशाळेत इन्फ्रारेड स्पेक्ट्रम अॅण्ड गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रम चाचणीचा अहवाल गुरुवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
लॅबॉरेटरी नाहीच
उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ए.के. जैन यांनीही असा दावा केला आहे की, पीईटीएन यासारख्या स्फोटकांची विश्वासार्ह चाचणी करणारी एकही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी उत्तर प्रदेशात नाही.
या ठिकाणी दारूगोळ्यांची चाचणी करणारेच तज्ज्ञ आहेत. १४ जुलै रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ कागदी पुडीत पीईटीनएन (पेन्टाइरिथ्रिटोल टेट्रानायट्रेट) या शक्तिशाली स्फोटकांची पावडर आढळल्याने देशभर खळबळ उडाली होती.