राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान बत्ती गुल, 9 मिनिटे अंधारात भाषण देत राहिल्या द्रौपदी मुर्मू, चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 05:13 PM2023-05-06T17:13:32+5:302023-05-06T17:18:02+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याचा सर्वजण निषेध करत आहेत.
ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान बत्ती गुल झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भंजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या, त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी आपले भाषण अंधारात सुरूच ठेवले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याचा सर्वजण निषेध करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज खंडित झाली होती. वीज नसल्याने संपूर्ण सभागृहात अंधार होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. वीज खंडित झाल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. त्या हसत हसत म्हणाल्या की, "आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. आपण अंधारात बसलो आहोत पण अंधार आणि प्रकाश दोन्ही बरोबरीने घेऊ."
दुसरीकडे, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज विभागाने आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. माहिती व जनसंपर्क विभागानेही चूक मान्य केली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर गणेशी लाल, मंत्री प्रदीप कुमार अमत आणि कुलगुरू संतोष त्रिपाठीही उपस्थित होते.
चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
दरम्यान, ही वीज खंडित होण्याची घटना लोक सहजासहजी स्वीकारत नाही आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेचा लोकांकडून निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.