'भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:06 AM2019-06-10T10:06:33+5:302019-06-10T10:07:33+5:30
मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत
हैदराबाद - वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय झाला कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम मतदार आहेत. देशात मुस्लिमांसाठी जागा हवी पण मुस्लिम समाजाला कोणाची भीक नको अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
तेलंगणा येथे खासदार ओवेसी यांनी जनसभेला संबोधित करताना सांगितले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या दिवशी भारत स्वातंत्र झाला त्यावेळी आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. हा भारत गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यावधी लोकांचा असेल. मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत असं ओवेसी यांनी सांगितले.
काँग्रेसला ताकद, विचार आणि कठोर मेहनत घेण्याची इच्छा नाही. देशभरात भाजपा कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमेठीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम आहेत.
Asaduddin Owaisi, AIMIM: The Congress leader himself lost in Amethi & received victory in Wayanad. Isn't the 40% population of Wayanad Muslim? (09.06.2019) https://t.co/PxQJm7wWbz
— ANI (@ANI) June 9, 2019
काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीका केली होती. मुस्लीम समाजाला देशात बरोबरीचे हक्क आहेत. भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत असे ओवेसी म्हणाले होते. हैदराबाद येथील मक्का मस्जिद येथे एका सभेला ते संबोधित करत होते.
त्यावेळी ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवेसी म्हणाले. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते.