राम मंदिरासाठी आज दिल्लीमध्ये शक्तीप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 10:59 AM2018-12-09T10:59:56+5:302018-12-09T11:00:53+5:30
जवळपास 5 ते 8 लाख रामभक्त या धर्मसभेला येण्याचा दावा केला जात आहे.
नवी दिल्ली : राम मंदिराच्या निर्मितीसाठी गेल्याच महिन्यात शिवसेना आणि विहिंपने अयोध्येला जाऊन पुन्हा आंदोलन उभारण्याची घोषणा केलेली असतानाच आज दिल्लीमध्ये विहिंपने धर्मसभेचे आयोजन केले आहे. यामुळे रामलीला मैदान पूर्णत: भगवेमय होऊन गेले आहे. देशभरातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.
जवळपास 5 ते 8 लाख रामभक्त या धर्मसभेला येण्याचा दावा केला जात आहे. अनेक राज्यांतून हे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले असून त्यांची विविध मंदिरे, धर्मशाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमधून हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.
11 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामुळे भाजपसह अन्य राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी हिंदू संघटना कसून कामाला लागल्या आहेत. शक्तीप्रदर्शन पाहून हे पक्ष घाबरून तरी राम मंदिर बनविण्यासाठी कायदा आणतील अशी आशा या संघटनांना आहे.